पुणेकरांच्या प्रेमामुळे मावळते पोलीस आयुक्त भारावले, डॉ. के. व्यंकटेशम यांनी मानले नागरिकांचे आभार

समाजहिताच्या दृष्टीने पुण्यात प्रत्येक नाविण्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात करताना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रत्येक गोष्टीत नागरिकांनी काम करण्याची संधी दिली. पुण्याचा प्रवास हा मला सतत आठवणीत राहील. असे म्हणत मावळते पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांचे विशेष आभार मानले. मावळत्या आयुक्तांनी पुणेकरांना एसएमएसद्वारे एक संदेश पाठवला आहे. या संदेशामध्ये त्यांनी पुणेकरांचे आभार मानले आहेत. “पोलीस खात्यातील आमच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. तुम्ही गरजूंची सेवा करण्यासाठी मोठी संधी दिली. आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा प्रोत्साहन दिल्याबद्दल पुणेकरांचे विशेष आभार” असे त्यांनी संदेशात म्हटले आहे. पोलिसांना समजून घेतल्याबद्दल आणि पोलीस विभाग व गुन्हेगारी नियंत्रणात आम्हास नवीन मापदंड व पोलीस कार्यपद्धती प्रस्थापित करण्यास अनुमती दिल्याबद्दल त्यांनी पुणेकरांचे कौतुक केले.

पोलीस आयुक्तांकडून मराठी भाषेचे कौतुक
पुण्याकडून मिळालेल्या निर्व्याज आणि निखळ प्रेमामुळे हा प्रवास मला सतत आठवणीत राहील असे व्यंकटेशम म्हणाले. दररोजच्या संपर्कातून पुणेकरांनी मराठी भाषेच्या ज्ञानात भर घातली याबद्दलही त्यांनी आभार मानले आहेत. पोलीस आयुक्तपदाच्या सेवाकाळात पोलीस उपायुक्तांपासून पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वचनबद्धतेने व संघभावना ठेवून काम केले. त्यामुळे पुणे शहर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असे म्हणत डॉ.के. व्यंकटेशम यांनी सर्व कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

कर्मचाऱ्यांशी थेट संपर्कामुळे कामाचा दरारा
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांचे शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत घडणाऱ्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष होते. सर्वसामान्य नागरिकांपासून ते पोलीस दलातील कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांचा थेट संपर्क होता. कोणाताही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी लाचप्रकरणात सापडल्यास त्याच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे पोलीस दलाचा भ्रष्टाचाराचा आलेखही कमी झाला आहे. पुणे शहराच्या पोलीस आयुक्तपदी दोन वर्षांहून अधिक काळ काम करताना त्यांनी हप्तेखोरांसह वसुलीवाल्यांना मुख्यालयाचा रस्ता दाखविला होता.

आपली प्रतिक्रिया द्या