
शहरातील कोरोना संसर्गग्रस्तांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वयंशिस्तीचे धडे देण्यासाठी सिंहगड रोड पोलिसांनी अनोखा फंडा सुरू केला आहे. पोलिसांकडून विविध सोसायट्यांमध्ये जाऊन गाण्यांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला जात आहे. त्यासाठी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे सहकाऱ्यांसमवेत हातामध्ये माइक घेऊन गाणे गात मास्क पेहनो भाई… हात जोडता हूँ… तेरे पैर पडता हूँ अशी नागरिकांना साद घालत असल्याचे दिसून आले.
कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. त्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी सिंहगड पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सोसायट्यांसह मुख्य चौकामध्ये ध्वनिक्षेपकावर गाणी गाऊन लोकांना कोरोना नियमावलीचे महत्त्व पटवून दिले जात आहे. सिंहगड पोलिसांकडून आज शिवसहवास सोसासटीसह विविध सोसायट्यांच्या आवारात ध्वनिक्षेपकावर कोरोना नियमावलीबाबत जनजागृती करण्यात आली. त्याशिवाय स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कळमकर यांच्या आवाजात नवले ब्रीज, वडगाव ब्रीजसह मोठ्या चौकांमध्ये गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
सोसायट्यांमधील रहिवाशांसह अत्यावश्यक कामांसाठी रस्त्यावर बाहेर फिरणाऱ्या नागरिकांनीही पोलिसांच्या गाण्याला साद दिल्याचे दिसून आले. नागरिकांना हात जोडून मास्क वापरण्याची विनंती करण्यात आली. सोशल डिस्टन्स, मास्कच्या वापराबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. पोलिसांकडून गाणे गात असताना सोसायट्यांतील रहिवाशांकडून टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला जात होता. पोलिसांच्या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. जनजागृतीच्या उपक्रमात सिंहगडचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे, पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्यासह कर्मचारी आणि एसपीओंनी सहभाग घेतला होता.
विशेष पोलीस अधिकारीही उपक्रमात सहभागी
नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी एसपीओ उपक्रमात सहभाग घेतला होता. हातामध्ये फलक घेऊन नियमावली पाळा, कोरानाला दूर ठेवा, मास्कचा वापरा करा, सोशल डिस्टन्स बाळगा, अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडा, असा संदेश देण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आणि एसपीओंनी भर उन्हात गाण्यांद्वारे जनजागृती करीत नागरिकांची वाहवा मिळविली. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
”कोरोना संक्रमण टाळण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यामुळेच आज सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही सोसायट्या, महत्त्वाचे चौक, वर्दळीच्या परिसरात पोलिसांसह विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी (एसपीओ) एकत्र येऊन गाण्यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन केले. विविध चित्रपटांतील गाण्यांच्या चालीवर कोरोना नियमावलीची जनजागृती केली. बहुतांश सोसायट्यांतील रहिवाशी आणि नागरिकांनी गाण्यांना प्रतिसाद देऊन नियमावलीचे पालन करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे.” – देवीदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड पोलीस ठाणे




























































