राजकारणात फिल्मी ड्रामा, जिग्नेश मेवाणींविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातील लेखिका शेफाली वैद्य यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान तसेच त्यांचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रमुख श्रीश्री रविशंकर यांच्यासोबतचा मॉर्फ केलेला फोटो ट्विट केल्याप्रकरणी गुजरातचे आमदार जगदीश मेवाणी यांच्याविरोधात पुण्याच्या ग्रामीण पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

oh-my-god-1

मेवाणी यांनी शेफाली वैद्य, योगी आदित्यनाथ आणि श्रीश्री रविशंकर तिघांच्या फोटोची व ‘ओ माय गॉड’ या चित्रपटातील एका फोटोशी तुलना करणारे आक्षेपार्ह ट्विट २९ मे रोजी केले होते. “अरेरे, यांना बघून खरंच ओ माय गॉड बोलावे लागत आहे. खूपच फिल्मी झाले आहे हे. चित्रपटातील कलाकारांप्रमाणेच हे तिघेही मोठे कलाकार आहेत. ड्रामेबाज’ असे ट्विट मेवाणी यांनी केले होते. मात्र या ट्विटसोबत त्यांनी वापरलेला शेफाली यांचा योगी आदित्यनाथ व श्रीश्री यांच्या सोबतचा फोटो हा मॉर्फ केलेला होता. मेवाणी यांना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते ते ट्विट डिलीट केले होते.

‘जनतेने निवडून दिलेल्या जिग्नेश मेवाणी यांच्यासारख्या आमदाराने त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकारांचा लोकांवर टीका करण्यासाठी गैरवापर करणे चुकीचे आहे. त्यांना माझी मतं पटत नाही म्हणून त्यांनी माझ्यावर अशा प्रकारे टीका केली आहे. आमदारांनी त्यांच्या मतदार संघात जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. पण जर आमदार असे न करता. त्यांच्या पदाचा लोकांवर टीका करण्याठी, लोकांची बदनामी करण्यासाठी वापर करत असेल तर ते लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याचे आहे. जर येत्या काही दिवसात मला काही झाले तर त्याचे जबाबदार कोण असतील हे वेगळे सांगायला नको’, असे ट्विट शेफाली वैद्य यांनी केले आहे.

याप्रकरणी शेफाली वैद्य यांनी रविवारी पुण्याच्या सायबर क्राईम विभागाकडे याबबात तक्रार दाखल केली. त्यानंतर सायबर विभागाने त्यांची तक्रार पौड पोलीस ठाण्याकडे वर्ग केली. याप्रकरणात मंगळवारी अधिकृतरित्या मेवाणींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. ‘मेवाणी यांनी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेच्या परवानगीशिवाय तिचा फोटो त्यांच्या ट्विटमध्ये वापरला आहे. त्यांनी एका बॉलिवूड चित्रपटातील कलाकारांशी महिलेची तुलना करत त्यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ असे सहाय्यत पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील यांनी सांगितले.