
नगर व पुणे जिल्हयातील वाळूू तस्करांनी संघटीतपणे कुकडी नदीपात्रात सुरू केलेल्या वाळू तस्करीच्या विरोधात स्थानिक नागरीकांच्या तक्रारीनंतर रविवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एक पोकलेन जप्त करण्यात आले आहे. वाळू उपसा करणारी यांत्रिक उपकरणे व इतर वाहने पोलिसांची चाहूल लागल्यामुळे पळवून नेण्यात वाळू तस्कर यशस्वी झाले.
निघोजच्या ढवणवाडी परिसरातील कुकडी नदीपात्रात एक पोकलेन, दोन जेसीबी मशिन वाळूचा अवैध उपसा करून सहा ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करीत असल्याची तक्रार स्थानिक नागरीकांनी स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडे केली होती. वाळू उपसा तसेच वाहतूकीचे चित्रीकरणही पोलिसांना पाठविण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पवार यांनी तात्काळ पारनेर पोलिस ठाण्यास सुचना देउन कुकडी नदी पात्रात छापा टाकला. यावेळी पोलिसांनी एक पोकलेन ताब्यात घेतले. मात्र दोन जेसीबी व सहा ट्रॅक्टर पाळवून नेण्यात वाळू तस्कर यशस्वी झाले. याप्रकरणी पोकलेन चालक दिपक एकनाथ भापकर याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
































































