
दहशत माजविण्यासाठी मद्यपान करून नशेत असणाऱ्या टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर जोंधळे चौक परिसरात घडली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पाच जणांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रस्त्यातून आम्हाला आडवा गेला म्हणून टोळक्याने तरुणांना मारहाण केली आहे.
सुखेदव गायकवाड (वय 27) आणि श्रीदर्शन काळे (वय 23) हे तरूण जखमी झाले आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले सर्व तरूण सिंहगड रोड परिसरातील असून ते केळकर रस्त्यावर आले होते. त्यांनी मद्यपान केलेले होते.
यावेळी जोंधळे चौकातून सुखेदव गायकवाड जात असताना टोळक्याने आमच्या समोरून का गेला, या रागातून त्याला भरचौकात बेदम मारहाण केली. लाथा-बुक्यांनी व दगडाने त्याला मारहाण केली. त्यानंतर टोळक्याने काही अंतर केळकर रस्त्यावर श्रीदर्शन काळे तरुणाला मारहाण केली. टोळक्याच्या मारहाणीत दोघेही जखमी झाले आहेत. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
विनाकारण दोघांना केली मारहाण
सुखदेव गायकवाड हा किराणा दुकानात कामाला आहे. मालाची ने-आण करण्याचे त्याच्याकडे काम असते. तर, श्रीदर्शन देखील टोळक्यातील कोणाला ओळखत नाही. मात्र टोळक्यांनी दहशतीसाठी त्यांना मारहाण केल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले. टोळक्याला दहशत निर्माण करायची होती. त्यामुळे त्यांनी मारहाण केली.




























































