अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली भटकंती भोवणार, निकड असल्यास प्रवास करा; पण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येत्या शनिवारी आणि रविवारी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण भटकंती करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मात्र, नागरिकांनो तुम्हाला लसीकरणाला जायचे आहे, रूग्णाला डबा पोहोच करायचा आहे, औषधांची देवाण-घेवाण करायची असल्यास चिंता करू नका. कारण संबंधित कारणांसाठी महत्वाची कागदपत्रे जवळ बाळगल्यास पोलीस प्रशासनाने प्रवासाला मुभा दिली आहे.

शहरात शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून कडकरित्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नाकाबंदीदरम्यान बेशिस्त आणि विनाकारण वाहनचालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासंदर्भात पोलिसांनी तयारी केली असून जागोजागी नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि चेकिंगला प्राधान्य दिले आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण भटकंती करणाऱ्यांची वाहने जप्त केली जाणार आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला रूग्णालयात जाणाऱ्या नागरिकांची अडवणूक केली जाणार नाही. परंतु, नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता संबंधितांना करावी लागणार आहे. त्याशिवाय रुग्णांना डबा पोहोच करणे, औषधोपचारासाठी इतर ठिकाणी प्रवास करणे, रुग्णसोबत प्रवास करणाऱ्यांची कारवाईपासून सुटका करण्यात आली आहे.

अत्यावश्यकतेचा गैरफायदा नको

कोरोना साखळी तोडण्यासाठी स्वयंशिस्त बाळगणे महत्वाचे आहे. त्यासाठी नागरिकांनी शनिवार आणि रविवारी घरातच बसले पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडल्यास संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काहीजणांकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. नाकाबंदीदरम्यान तसे काही आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याच इशारा पोलिसांनी दिला आहे.

‘कडक निबर्धांत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह लसीकरणाला जाणारे नागरिक, रूग्णांना डबे देणे, औषध पोहोच करणाऱ्यांना प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगणे गरजेचे आहे. अत्यावश्यकतेच्या नावाखाली विनाकारण गैरफायदा घेऊन भटकंती करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे’, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे म्हणाले.