
भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिला सरपंचाला कानशिलात मारून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कदम-वाकवस्ती येथे शुक्रवारी सकाळी घडला. याप्रकरणी लोणी काळभोर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुजित सुभाष काळभोर (रा. वाकवस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पांडवदंड रोड कदमवाक वस्ती येथील महिला सरपंचाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला सरपंच संभाजीनगर येथील एंजल हायस्कूल येथे लसीकरण सुस्थितीत पार पाडण्यासाठी उपस्थित होत्या. त्यावेळी लसीकरण केंद्रावर अविनाश उर्फ पप्पू बडदे व आरोपी काळभोर यांच्यात वाद झाला. सुजित काळभोरने बडदे यांच्या कानाखाली लगावली. दोघांमधील हे वाद पाहून महिला सरपंच यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केली. याच्याच रागातून सुजित काळभोर यांनी महिलेच्या कानशिलात लगावत त्यांची साडी ओढली. याप्रकरणात काळभोरवर विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लोणी-काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे.


























































