
पंजाब मधील सरकारी कार्यालये सकाळी 7.30 वाजता सुरू करण्याचा निर्णय तिथल्या सरकारने घेतला आहे. पंजाबमधील सरकारी कार्यालयांच्या कामकाजाची वेळ बदलण्यात आली असून ती आता सकाळी 7.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली राहतील. मंगळवारपासून पंजाबमधील सरकारी कार्यालयांच्या कामाच्या नव्या वेळा लागू करण्यात आल्या. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी सकाळीच सचिवालय कार्यालयात हजेरी लावली आणि तिथे बसून कामकाज पाहिले. पंजाब सरकारने हा निर्णय वीज वाचवण्यासाठी घेतला आहे. 2 मे ते 15 जुलैपर्यंत पंजाबमधील सरकारी कार्यालये सकाळी 7.30 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील.
पंजाब सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे मान यांनी म्हटले आहे. या निर्णयाचा फायदा होणार असून लोकांनीही या निर्णयाला पाठिंबा द्यावा असे आवाहन मान यांनी केले आहे. लोकांनी सकाळीच आपले अर्ज द्यावेत त्यावर सकाळी 8-9 वाजेपर्यंत निर्णय घेतले जातील आणि सर्वसामान्य माणसे आपापल्या कामाला निघून जाऊ शकतील असे मान यांनी म्हटले. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदीन व्यवहारावर परिणाम होणार नाही, त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही आणि त्यांना सुट्टीही घ्यावी लागणार नाही असे मान यांचे म्हणणे आहे.
मान यांनी आपल्या या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे की सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य माणसे त्यांच्या घरच्यांना जास्त वेळ देऊ शकतील. सकाळी मुलं शाळेत जातील आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरचेही कामासाठी सरकारी कार्यालयात जातील. सरकारी कार्यालये 2 वाजता बंद झाल्यानंतर ही मंडळी आपल्या मुलांना शाळेतून परत घरी घेऊन येऊ शकतील. मान यांनी म्हटलंय की सरकारच्या या निर्णयामुळे रोज 330 मेगावॅट विजेची बचत होणार आहे. पंजाब सरकारचे यामुळे 70 कोटी रुपये वाचतील असेही सांगितले जात आहे. पीक अवर म्हणजेच वीजेची मागणी सर्वाधिक असताना दुपारी दीड ते दुपारी 4 वाजेपर्यंत वीजेचा सर्वाधिक वापर होतो. या काळात सरकारी कार्यालये बंद असल्याने वीजेची तेवढीच बचत होऊ शकेल. हा निर्णय फक्त सरकारी कार्यालयांसाठी असल्याचे मान यांनी म्हटले आहे.
























































