
आपल्या देशात सोने घालून मिरवण्याची प्रत्येकाचा हौस असते. सणा-वाराला तर याची क्रेझ अधिकच वाढते. परंतु इतर दिवशी हे सोने बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेले असते. परंतु एका महिलेला बँकेच्या लॉकरमध्ये सोने ठेवणे महागात पडले असून तिचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल 65 लाखांचे सोने बँकेच्या लॉकरमधून चोरीला गेले आहे.
उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील सिहानी गेट पोलीस स्थानकांर्गत येणाऱ्या एका पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेमध्ये हेराफेरीचे प्रकरण समोर आले आहे. अशोक नगर मध्ये राहणाऱ्या प्रियंका गुप्ता यांचे 20 वर्षांपासून या बँकेमध्ये खाते आहे. या बँकेच्या लॉकरमध्ये त्यांनी आपले दागिने ठेवले होते. तब्बल 65 लाखांचे हे दागिने होते.
2019 मध्ये प्रियंका यांनी बँकेच्या लॉकरचा वापर केला होता यानंतर डिसेंबर 2021 मध्ये लॉकर खोलण्यासाठी बँकेशी संपर्क केला, मात्र चावी न बसल्याने लॉकर उघडले गेले नाही. याबाबत बँक कर्मचारी आणि मॅनेजरशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही. अखेर त्यांनी लॉक तोडण्याचा निर्णय घेतला.
बँक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लॉकर तोडण्यात आले. लॉकर उघडताच प्रियंका यांच्या पायाखालची जमिन सरकली. लॉकरमध्ये एकही दागिना नव्हता. फक्त पिवळ्या कपड्यातील काही सामान पडलेले होते. मात्र दागिने गायब होते. यानंतर प्रियंका यांनी गाझियाबादमधील सिहानी गेट पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी बँकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


























































