व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर शस्त्रास्त्रांचे फोटो ठेवणे अंगलट आले, सराईतासह दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारी आणि तीक्ष्ण हत्यारांचे फोटो ठेवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईतासह दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.

अमर लक्ष्मण गायकवाड (23, रा. जनता वसाहत) व भीमा शत्रुघ्न शिंदे (22, वाघजाई मित्रमंडळ, जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसद्वारे गुन्हेगारी किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दरम्यान, दत्तवाडीत दोघेजण व्हॉट्सअप स्टेट्सला तलवारी व घातक हत्यारांचे फोटो ठेवून दहशत निर्माण करत असून त्यांच्याकडे हत्यारे असल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि प्रमोद भोसले यांना मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर आणि पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, कर्मचारी प्रमोद भोसले, विष्णू सुतार, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर व बजरंग पवार यांच्या पथकाने दोघांना अटक केली.

त्यांच्याकडील तलवार व पालघन जप्त करण्यात आले आहे. अमर गायकवाड सराईत गुन्हेगार असून काही दिवसांपासून तो व्हॉट्सअपला सतत शस्त्राचे फोटो ठेवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.