
राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवरील वाहनांच्या वेगमर्यादेबाबतचे संभ्रम दूर करा, जागोजागी वेगमर्यादेचे फलक लावा, अशी मागणी विशेष उल्लेखाच्या माध्यमातून शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषदेत केली.
राज्यातील प्रत्येक रस्त्यावर वाहनांच्या आणि रस्त्यांच्या प्रकारानुसार वेगवेगळय़ा वेग मर्यादा असून त्याविषयी माहिती वाहनचालकांना सहजपणे मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनचालकांना रोज भुर्दंड सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गावर समतल भाग, घाट भाग, द्रुतगती महामार्ग, महापालिका क्षेत्र या ठिकाणी वाहनांच्या प्रकारानुसार वेगवेगळी वेगमर्यादा आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर वेगमर्यादेचे फलक लावण्याचे पत्र काढले आहे. परंतु हे फलक केंद्राच्या नियमानुसार 100 किमी प्रति तास वेगमर्यादेचे लावायचे की, राज्य सरकारच्या नियमानुसार 90 किमी प्रति तास वेगमर्यादेचे लावायचे याबाबत अजूनही संभ्रम असल्याचे विलास पोतनीस यांनी स्पष्ट केले आहे.



























































