सिंधूचा विजयारंभ; मालविका पराभूत

हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत विजयारंभ केला, पण झुंजार मालविका बनसोड हिला सलामीलाच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली.

सिंधूने कॅनडाच्या वेन यू झांगचा 21-14, 21-9 असा 31 मिनिटांत पराभव करत दुसरी फेरी गाठली, मात्र पुढील फेरीत सिंधूसमोर मोठं आव्हान असणार आहे, कारण तिची गाठ टोकियो ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती आणि सध्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या चीनच्या चेन यू फेईशी पडणार आहे. या स्पर्धेत इतर हिंदुस्थानी खेळाडूंनी निराशा केली. मालविका बनसोड, अनमोल खरब, प्रियांशू राजावत आणि किरण जॉर्ज यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मालविकाला थायलंडच्या आठव्या मानांकित सुपानिदा कातेथॉन्गकडून 21-14, 18-21, 11-21 अशा पराभव पत्करावा लागला. प्रियांशूला पुरुष एकेरीत सातव्या मानांकित जपानच्या कोदाई नारोकाकडून 21-14, 10-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. अनमोल खरबने दुसऱया सेटमध्ये चांगला खेळ केला होता, पण अखेरीस त्याला चेनकडून 11-21, 22-24 असा पराभव स्वीकारावा लागला. या वर्षी इंडिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलेल्या किरण जॉर्जला चीनच्या वेंग हॉन्ग यांगने 19-21, 17-21 असे हरविले. आर. संतोष रामराज याला पुरुष एकेरीत दक्षिण कोरियाच्या किम गा युनकडून 14-21, 8-21 अशा सरळ सेट्समध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.