सिंधूची विजयी सलामी; श्रीकांत, सेन यांना पराभवाचा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने इंडोनेशिया ओपन स्पर्धेत दमदार विजयी सलामी दिली. मात्र मालविका बनसोड, किदाम्बी श्रीकांत व लक्ष्य सेन यांना पराभवाचा सामना करावा लागला.

जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावर असलेल्या सिंधूने महिलांच्या एकेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिचा 25-23, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव केला. दरम्यान, हिंदुस्थानच्या मालविका बनसोडला थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगकडून 21-12, 21-10 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत हिंदुस्थानच्या किदांबी श्रीकांतचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. जपानच्या युशी तनाका याने श्रीकांतचा 21-19, 21-15 असा सरळ गेममध्ये पराभव केला. हा सामना 37 मिनिटांत संपला. याचबरोबर हिंदुस्थानचा अव्वल खेळाडू लक्ष्य सेन याला यजमान इंडोनेशियाच्या अल्वी फरहानकडून 21-19, 21-16 असा पराभव स्वीकारावा लागला.