
शहरात घरफोड्या, दुचाकी चोरी, दोन गटांतील भांडणांसह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण काढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त वाढवून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याच्या हेतूने 396 ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी भेटी देणे बंधनकारक आहे. त्यासाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी पुढाकार घेतला असून, आणखी शंभर ठिकाणी क्यूआर कोड लावले जाणार आहेत.
सोलापूर शहरात दरमहा सरासरी 35 दुचाकींची चोरी, तर 10 ते 12 ठिकाणी घरफोडी होते. परगावी किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्यांच्या अनेक घरांमध्ये चोरी झाली आहे. चेन स्नॅचिंग व मोबाईल हिसकावण्याचेही प्रकार होत आहेत. अनेकदा दोन गटांत हाणामारी, दगडफेक अशाही घटना घडल्या आहेत. वर्दळीच्या ठिकाणी चोरी, अपार्टमेंट, बंगल्यांमध्ये चोरी होऊ लागली असून पार्किंग असो वा रस्त्यालगत, मंदिराजवळ, दुकानाजवळ लावलेल्या दुचाकी चोरी होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने पोलीस उपायुक्त कबाडे यांनी क्यूआर कोड पेट्रोलिंग सुरू केली आहे. त्यातून शहरातील नागरिकांना सुरक्षित वाटेल, गुन्हेगारी कमी होईल, असा सर्वांनाच विश्वास आहे.
सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्याअंतर्गत 396 ठिकाणी क्यूआर कोड लावले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दररोज दिवसा व रात्री 112 हेल्पलाईनच्या दोन गाडय़ा, पाच बीट मार्शल, दोन अधिकारी (पोलीस उपनिरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक), एक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्याकर वॉच ठेवण्यासाठी एक सहायक पोलीस आयुक्त, असे सर्वजण पेट्रोलिंग करतील. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दररोज त्याठिकाणी जाऊन स्वतःच्या मोबाईलमध्ये तो क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. अडचणीतील लोकांना मदत हवी असल्यास त्यांच्यासाठी ‘112’ हा टोल फ्री क्रमांक (हेल्पलाइन) आहेच.
सराईत गुन्हेगारांवर राहणार ‘वॉच’
सोलापूर शहरातील सराईत गुन्हेगारांवर दररोज पेट्रोलिंग करणाऱ्यांचा कॉच असणार आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी रेकार्डवरील गुन्हेगारांच्या घरी भेटी देऊन तो घरात आहे का, बाहेर असल्यास तो कोठे आहे, त्याच्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती घेणे बंधनकारक आहे. जेणेकरून तो गुन्हेगार शहरातील नवीन गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे की नाही, याची खात्री होईल. त्यातून गुन्हेगारी आटोक्यात येईल, असा हेतू आहे.
…तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ‘शो कॉज’
आठ-दहा दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 396 ठिकाणी क्यूआर कोड लावले आहेत. परंतु, सद्यस्थितीत 50 ते 55 ठिकाणीच पेट्रोलिंग करणारे अधिकारी, कर्मचारी भेटी देत आहेत. पुढील आठवड्यापासून 100 टक्के क्यूआर कोड स्कॅनिंग न झाल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.
सोलापूर शहरात वेगवेगळ्या 396 ठिकाणी ‘क्यूआर कोड’ लावले असून, पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तो कोड स्वतःच्या मोबाईलवर स्कॅन करणे बंधनकारक आहे. शहरातील नागरिकांची सुरक्षितता व गुन्हेगारांवर वचक, यासाठी पेट्रोलिंग वाढविली जात आहे.
– विजय कबाडे, पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर.



























































