IPL 2025 आज फायनलसाठी तिकीटयुद्ध, ‘क्वालिफायर वन’मध्ये आज पंजाब-बंगळुरू यांच्यात राडा

आयपीएलमध्ये सलग 18 हंगाम खेळूनही एकदाही चॅम्पियन न झालेले पंजाब आणि बंगळुरू हे कमनशिबी संघ फायनलचे तिकीट बुक करण्यासाठी गुरुवारी क्वालिफायर वनमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघांनी अखेरच्या साखळी लढतीत जबरदस्त विजय नोंदवलेत. त्यामुळे क्वालिफायर वन जिंकण्यासाठी दोघेही आपले सर्वस्व पणाला लावून खेळतील, याबाबत तीळमात्र शंका नाही.

उद्या मुल्लानपूरला जेतेपदाच्या दिशेने एक पाऊल याच ध्येयाने पंजाब आणि बंगळुरू मैदानात उतरतील. टॉप टू स्थान म्हणजे जेतेपदाची गॅरंटी असल्यामुळे हे गॅरंटीचे तिकीट सर्वप्रथम बुक करण्यासाठी दोघेही उत्सुक आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात स्थान न मिळाल्याने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर निराश असला तरी त्याने आपल्या संघाला चॅम्पियन करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. दुसरीकडे आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या विराट कोहलीसुद्धा आपल्या आयपीएल जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी आपली सर्वोत्तम कामगिरी देतोय. त्यामुळे आता नशीब कुणाच्या बाजूने काwल देतोय, याकडे साऱयांचे लक्ष लागलेय.

जितेश शर्माने ताकद वाढवली

मंगळवारी बंगळुरूला जितेश शर्माच्या झंझावाताने टॉप टूची भेट दिली. अवघड वाटणारे आव्हान जितेशने आपल्या फटकेबाजीने आवाक्यात आणले. त्याचा झंझावात निर्णायक होताच, पण विराट कोहलीनेही आपले अर्धशतकी सातत्य ठेवताना बंगळुरूच्या विजयाचा पाया रचला. जितेशच्या झंझावाताने बंगळुरूची ताकद नक्कीच वाढलीय. त्यातच जॉश हेझलवूडचे पुनरागमन त्यांच्यासाठी स्फूर्तिदायक ठरणारी बाब आहे. भुवनेश्वरच्या साथीने बंगळुरूची गोलंदाजी आणखी घातक होणार यात वाद नाही.

मार्को यान्सनची उणीव भासणार

मार्को यान्सन जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी लंडनला रवाना झालाय. त्याच्यामुळे पंजाबची गोलंदाजी काहीशी कमकुवत झालीय. अर्शदीपच्या साथीने तोच संघाला सावरत होता. त्यामुळे यान्सनची उणीव जाणवणार. मात्र गेले दोन सामने विश्रांती घेत असलेला युझवेंद्र चहल परतल्याने संघाचे मनोधैर्य उंचावलेय. तसेच यान्सनच्या जागी अझमतुल्लाहचे अंतिम संघात खेळणेही नक्की मानले जात आहे. दोन्ही संघांनी साखळीत प्रत्येकी नऊ विजय मिळवल्यामुळे विजयाची दशमी साजरी करण्याचे दोघांचेही प्रयत्न असतील. फक्त त्यात यशस्वी कोण ठरतो, ते काळ आणि वेळच ठरवेल.