सुप्रिमोतूनही देशाला खेळाडू मिळतील, उद्धव ठाकरे यांना विश्वास; सुप्रिमो चषकाचे दिमाखदार उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमधून देशाला खेळाडू मिळतात, तसेच गुणवान खेळाडू आपल्या टेनिसच्या आयपीएलमधून हिंदुस्थानी संघाला मिळतील, असा विश्वास सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेच्या दहाव्या मोसमाच्या उद्घाटनप्रसंगी  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऐतिहासिक सुप्रिमो चषकाचे अनावरणही करण्यात आले.

सांताक्रुझच्या एअर इंडिया स्पोर्ट्सच्या स्टेडियमवर षटकार-चौकारांची फटकेबाजी सुरू होण्याआधी झालेली फटाक्यांची आतषबाजी, अंगावर शहारे आणणारे उत्साही कलाकारांचे भन्नाट सादरीकरण आणि प्रेक्षकांच्या अभूतपूर्व गर्दीने क्रिकेटमय झालेले वातावरण सुप्रिमो चषकाची अफाट लोकप्रियता दर्शवित होती. सारेकाही दृष्ट लागण्याजोगे असलेल्या  प्रफुल्लित वातावरणात टेनिस क्रिकेटची आयपीएल असलेल्या सुप्रिमो चषकाचा पाचदिवसीय धमाकेदार थरार आजपासून सुरू झाला. या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन सिनेस्टार सुनील शेट्टी यांनी फलंदाजी करून केले. याप्रसंगी हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू लालचंद राजपूत, पिच क्युरेटर नदीम मेमन, आमदार सुनील प्रभू, आमदार सुनील शिंदे, सुप्रिमो चषकाचे आयोजक आमदार-विभागप्रमुख संजय पोतनीस आणि आमदार विभागप्रमुख ऍड. अनिल परब उपस्थित होते.

जणू आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धाच

आज प्रत्यक्ष सुप्रिमोचे आयोजन पाहाताना ही एखादी टेनिस नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा असल्याचा अनुभव प्रेक्षकांना आला. स्पर्धेच्या आयोजनानिमित्त स्टेडियमला करण्यात आलेली रोषणाई, प्रेक्षकांसाठी उभारण्यात आलेली गॅलरी आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींना ‘यूटय़ूब’च्या माध्यमातून अत्युच्च दर्जाचे थेट प्रक्षेपण पाहाता यावे म्हणून लावण्यात आलेले चौदा कॅमेरे, तसेच खेळ आणि खेळाडूंबरोबर प्रेक्षकांचाही वेगवेगळय़ा बक्षिसांनी कौतुक केले जाणार असल्यामुळे सुप्रिमोचे सर्वांनीच जोरदार स्वागत केले. उद्घाटन जोरदार व्हावे म्हणून प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अजय सकपाळच्या पथकाने सादर केलेले नृत्य आणि आपल्या तालबद्ध ढोलताशांनी वातावरण भारावून टाकण्याची किमया मराठा ढोलताशा पथकाने केली.

सुप्रिमो म्हणजे मिनी आयपीएलच

दरवर्षी सुप्रिमो चषकाचा अंतिम सामना पाहायला येतो, पण आज उद्घाटनाला आलोय. सध्या आयपीएल सुरू आहे, पण आपला सुप्रिमो चषक म्हणजे मिनी आयपीएलच आहे. इथेसुद्धा देशभरातून अनेक संघ आले आहेत. सुप्रिमोच्या दिमाखदार आयोजनासाठी अनिल परब आणि संजय पोतनीस यांचे विशेष कौतुक आहे. हे दोघे सुप्रिमो चषकाचे कॅप्टन आहेत आणि इथे मी त्यांच्या टीमचेही खास कौतुक करतो. सुप्रिमोचा सुरुवातीचा काळही मला चांगला आठवतोय, पण आता म्हणता म्हणता सुप्रिमो चषकाने आपली कीर्ती देशभर नेलीय. जशा त्या आयपीएलमधून देशाला खेळाडू मिळतात तसेच खेळाडू आपल्या टेनिस आयपीएलमधून हिंदुस्थानी संघाला मिळतील, याची मला खात्री असल्याचे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.