
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दिल्लीतील आंबेडकर नगर येथे ‘जोरु का गुलाम’ म्हटल्याने झालेल्या भांडणात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद असं मृत तरुणाचं नाव असून तो दिल्लीतील आंबेडकर नगर परिसरात पत्नी आणि मुलांसह राहत होता. रविवारी रात्री साधारण ९.३० च्या सुमारास त्याचं शेजारी राहणाऱ्या सचिन आणि त्याचा भाऊ सनीशी भांडण झालं.
भांडण झालं त्यावेळी विनोदसह दोन्ही आरोपी देखील नशेत होते. त्याचदरम्यान सचिनने विनोदला ‘जोरु का गुलाम’ असं म्हटलं. त्यामुळेच त्यांच्यातील वाद अधिकच वाढला. विनोदने सचिनच्या कानाखाली लगावली. संतापलेल्या सचिन आणि त्याच्या भावाने विनोदला बोदम मारहाण करायला सुरुवात केली. या संपूर्ण घटनेनंतर रात्री विनोदची प्रकृती खालावली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तसेच त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यामध्ये विनोदचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. विनोदच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सचिन विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.






























































