
अवकाळी पावसावर मात करत नगर जिल्ह्यात धिम्या गतीने रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू आहेत. आतापर्यंत ऊस, कांदा यांच्यासह 5 लाख 2 हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पेरण्या झालेल्या आहेत. यात कांद्याची विक्रमी 1 लाख 4 हजार 748 हजार हेक्टरपर्यंत लागवड पोहोचली आहे. पेरणी कालावधीनंतरही ज्वारीची पेरणी झाल्याने ज्वारीचे क्षेत्र 1 लाख 75 हजार हेक्टरवर पोहोचले आहे. जिह्यात ऊस आणि कांद्याशिवाय 2 लाख 85 हजार 121 हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. याचे प्रमाण 39 टक्के आहे.
परतीच्या पावसामुळे रब्बी ज्वारीच्या पेरण्यांवर मोठा परिणाम झाला. मात्र, ज्वारी पेरणीचा कालावधी संपल्यानंतरही मोठय़ा प्रमाणात ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्या शेतकऱयांची शेती विहीर बागायत आहे, त्यांनी उशिरा ज्वारीची पेरणी केली आहे. यामुळे ज्वारीचे क्षेत्र 1 लाख 75 हजार 491 हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. गव्हाच्या पेरणीचे क्षेत्र वाढत असून, आतापर्यंत सरासरीच्या 40 हजार 801 हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. पेरणीची टक्केवारी 72 टक्के आहे. यांसह हरभरा पिकाची पेरणी 53 हजार 772 हेक्टर झाली असून, पेरणी टक्केवारी 35 टक्के झाली आहे.
ज्वारीवर ‘चिकटा’चा प्रादुर्भाव
n नगर जिह्यात अनेक भागात उशिरा पेरणी झालेल्या ज्वारी पिकावर जिह्यात अनेक ठिकाणी चिकटा या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यंदा अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचे क्षेत्र कमी होऊन शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहेत. यामुळे कांदा पिकाची लागवड विक्रमी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 1 लाख 4 हजार 748 हेक्टरवर लागवड झालेली आहे.
पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये (कंसात टक्केवारी)
n ज्वारी -1 लाख 75 हजार 491 (37 टक्के), गहू – 40 हजार 801 (72), मका – 14 हजार 766 (41), हरभरा – 53 हजार 772 (35), करडई – 46 (7), ऊस – 54 हजार 288 (53), चारा पिके – 43 हजार 390, कांदा – 1 हजार 4 हजार 748, बटाटा – 793, टोमॅटो- 613, भाजीपाला – 8 हजार 738, मसाला पिके- 99, औषधी, सुगंधी वनस्पती- 24, फुले – 683, फळबागा – 3 हजार 503 हेक्टरवर लागवड झालेली आहे.



























































