पंधरा लाखाच्या मांडूळ सापासह तिघांना पकडले, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषणची कामगिरी

मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत असताना निवळी-बावनदी येथील बसस्टॉपजवळ रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पंधरा लाखांच्या मांडूळ जातीच्या सापांसह तिघांना जेरबंद केले आहे. मांडूळ साप विक्रीत मोठे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलीस पथक सरकारी व खाजगी वाहनाने मुंबई गोवा हायवे रोडवर हातखंबा ते संगमेश्वर असे पेट्रोलिंग करीत होते. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दित मौजे निवळी बावनदी येथील बस स्टॉपजवळ एक चार चाकी वाहन संशयास्पदरित्या दिसून आले.

हे वाहन तसेच वाहनातील व्यक्तींची झडती घेतली असता, चार चाकी वाहनामध्ये एक वन्यजीव जीवंत मांडुळ जातीचा साप मिळून आल्याने वनपाल गौतम कांबळे यांना त्यांच्या पथकाने घटनास्थळी बोलावून घेऊन खात्री करण्यात आली. या वाहनामध्ये मांडुळ जातीचा साप मिळुन आल्याने वाहनातील इसमांकडे चौकशी केली असता सदर वन्य जीव मांडुळ जातीचा जिवंत साप हा विक्रीकरीता आणला असल्याची माहिती समोर आली.

गाडीतील सतीश युवराज मंडले (वय-25, रा.वाकुर्डे, ता.शिराळ, जि. सांगली), सुरेश सुनिल भोसले (वय -29 वर्षे, रा. शिवडे, ता.कराड, जि. सातारा), महोदव गोरख लोंढे (वय -39 वर्षे रा. कोपर्डी, हवेली, ता.कराड, जि. सातारा) यांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्याकडून 15 लाख किंमतीचे वन्य जीव मांडुळ जातीचा जिवंत साप तसेच त्यांचे ताब्यातील बोलेरो गाडी (क्र. एमए- 50- ए -0450) जप्त करण्यात आलेली आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण निरीक्षक हेमंतकुमार शहा,पोलीस निरीक्षक पोउनि विकास चव्हाण, पोहेकॉ प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, नितीन डोमणे, अरुण चाळके, पोना बाळु पालकर, अमोल भोसले, विजय आंबेकर, उत्तम सासवे, सत्यजित दरेकर, प्रविण खांबे, गुरुप्रसाद महाडीक चालक दत्तात्रय कांबळे यांनी केलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या