राधानगरी तालुक्यातील धरणांत 28 टक्केच पाणीसाठा, काळम्मावाडी धरणात अवघे 14 टक्के पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या तीव्र उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे राधानगरी, काळम्मावाडीसह तुळशी धरणांच्या पाणीसाठय़ात मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. राधानगरी तालुक्यातील या तिन्ही धरणांमध्ये केवळ 28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यासह या धरणांच्या लाभक्षेत्रात पाणीटंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काळम्मावाडी धरणात आजअखेर 14 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, गतवर्षी याच वेळी जवळपास 8 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. सध्या धरणातून 1610 घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी दूधगंगा नदीकाठावरील गावांना पाणी समस्या भासणार असल्याचे चित्र दिसत आहे. दूधगंगा काठावरील गावांबरोबर या पाण्यावर अवलंबून असणाऱया पिकांना पाणी समस्या भासणार नाही, याची जबाबदारी विभागाने घ्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. पावसाळ्याला तब्बल दीड महिन्यांचा कालावधी असल्याने पाण्याचे सूक्ष्म नियोजन होणे आवश्यक आहे.

राधानगरी धरणातील पाणीसाठय़ातही घट झाली असून, आजअखेर 32 टक्के पाणी शिल्लक आहे. गतवर्षी याचवेळी जवळपास 3.04 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. सध्या धरणातून 500 घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुळशी धरणातील पाणीसाठय़ात गतवर्षीच्या तुलनेत घट झाली असून, आजअखेर 39 टक्के पाणी शिल्लक आहे. गतवर्षी याच वेळी जवळपास 1.83 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. सध्या धरणातून 150 घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांची आकडेवारी

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणांत सरासरी 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राधानगरी 32 टक्के, तुळशी 39 टक्के, वारणा 39 टक्के, दूधगंगा 14 टक्के, कासारी 29 टक्के, कडवी 43 टक्के, कुंभी 46 टक्के, पाटगाव 30 टक्के.

तीव्र उन्हाळ्यामुळे धरणांतील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. तरीही शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी मागणीप्रमाणे सूक्ष्म नियोजन केले आहे. तुळशी जलाशयात पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. तरीही शेतकरी व नागरिकांनी पाणी जपून वापरावे.

– रावसाहेब गाडे, शाखा अभियंता, तुळशी धरण, धामोड, ता. राधानगरी.