राहुल गांधी यांची सलग दुसऱया दिवशी 8 तास चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘ईडी’ने सलग दुसऱया दिवशी आठ तास चौकशी केली. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ‘ईडी’ कार्यालयाकडे  येणाऱया सर्व रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त, बॅरिकेट्स लावून नाकाबंदी केली. काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले.

राहुल गांधी यांची सोमवारी ‘ईडी’ अधिकाऱयांनी दहा तास चौकशी केली होती. त्यांना मंगळवारी पुन्हा हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्याप्रमाणे आज सकाळी 11.05 वाजता काँग्रेस मुख्यालयातून निघून राहुल गांधी ‘ईडी’ कार्यालयात हजर झाले. त्यांच्याबरोबर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा होत्या. इतर काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयाबाहेर अडवले. सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत राहुल गांधी ‘ईडी’ कार्यालयात होते. एक तासाच्या ब्रेकनंतर पुन्हा 4.30 वाजता ते ‘ईडी’ कार्यालयात हजर झाले. दोन सत्रात आठ तास त्यांची चौकशी केल्याचे वृत्त ’पीटीआय’ने दिले आहे.

शेकडो काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

  • सोमवारप्रमाणेच आजही शेकडो काँग्रेस नेते, कार्यकर्ते काँग्रेस मुख्यालयात जमले होते. मुख्यालयाबाहेर शांततापूर्ण आंदोलन करणाऱया काँग्रेस कार्यकत्यांना पोलिसांनी रोखले.
  • काँग्रेस मुख्यालयापासून ‘ईडी’कडे जाणारे रस्ते पोलिसांनी अडविले. बॅरिकेट्स लावले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता.आंदोलन करणाऱया काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविले आणि ताब्यात घेतले.
  • केंद्रातील भाजप सरकारकडून ‘ईडी’चा गैरवापर सुरू आहे. विरोधकांवर सूडबद्धीने कारवाई केली जात आहे. या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस मुख्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. या अंदोलनात काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसचे खासदार, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.