मोदींना आंब्यांवर बोलायला वेळ आहे, सीबीएसई घोटाळ्यावर बोलायला नाही; राहुल गांधी यांचा जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीएसईच्या ऑन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) गोंधळावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला. ’नरेंद्र मोदींना आंब्यांवर बोलायला वेळ आहे, पण 18.5 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असलेल्या सीबीएसई घोटाळ्यावर बोलायला वेळ मिळत नाही,’ अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांनी आज ’एक्स’ पोस्ट करून सीबीएसई ओएसएम घोळावर सविस्तर प्रकाश टाकला. ’सीबीएसईच्या मे 2025 च्या टेंडरनुसार, उत्तरपत्रिका स्वयंचलित रोबोटिक स्कॅनरने स्कॅन करणे आवश्यक होते. स्कॅनिंग करताना उत्तरपत्रिकेची बांधणी जशीच्या तशी ठेवणे बंधनकारक होते आणि स्कॅनची गुणवत्ता किमान 300 डीपीआय (डॉट्स पर इंच) असणे आवश्यक होते. मात्र, रोबोटिक स्कॅनरची अट हटवून फक्त ’स्कॅनर’ असा उल्लेख करण्यात आला आणि स्कॅनिंगची गुणवत्ता 300 डीपीआय वरून 200 डीपीआयपर्यंत कमी करण्यात आली. कोएम्प्ट लिमिटेड (COEMPT) या विक्रेत्याने उत्तरपत्रिका स्कॅन करण्यासाठी मोबाईल फोनचा वापर केल्याचे उघड झाले आहे, याकडे राहुल यांनी लक्ष वेधले.

इतके होऊनही धर्मेंद्र प्रधान पदावर कसे?

धूसर प्रती, गहाळ पाने आणि स्कॅन न झालेल्या उत्तरपत्रिका या साध्या चुका नाहीत. एखाद्या विशिष्ट विक्रेत्याला अनुकूल ठरेल अशा प्रकारे तयार केलेल्या कराराचा हा अपेक्षित परिणाम आहे. हा गंभीर फसवणुकीचा प्रकार आहे आणि चुकीच्या मूल्यमापनामुळे ज्यांच्या गुणांवर परिणाम झाला, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फटका बसला आहे, असे राहुल गांधी म्हणाले. ’इतके सगळे होऊनही धर्मेंद्र प्रधान अजूनही पदावर आहेत,’ यावर राहुल यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

देशद्रोही ठरवलेल्या ’त्या’ विद्यार्थ्यांशी संवाद

सीबीएसई उत्तरपत्रिका तपासणीतील घोळ समोर आणणाऱया वेदांत व इतर विद्यार्थ्यांना सोशल मीडियात प्रचंड ट्रोल करण्यात आले. त्यांना पाकिस्तानी, सोरोस एजंट आणि देशद्रोही ठरवण्यात आले होते. राहुल गांधी यांनी आज या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला व देशद्रोही आणि सोरोस एजंट्सशी उत्तम संवाद अशी उपरोधिक टिप्पणीही केली. वेदांत आणि त्याच्या मित्रांनी केवळ सरकारला साधे प्रश्न विचारले होते. त्या बदल्यात त्यांना शिव्याशाप आणि अपमान सहन करावा लागला, याविषयी राहुल यांनी चिंता व्यक्त केली.