राहुल गांधींचा डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद, न्यायाच्या लढाईत पाठीशी असल्याचे दिले आश्वासन

बीड जिल्ह्यातील कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. डॉक्टर संपदाने दबाव व छळाला कंटाळून आयुष्य संपवले. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून करून हाय कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी केली पाहिजे तसेच भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बीड जिल्ह्यातील कवडगाव येथे जाऊन फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे आदी उपस्थित होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी पीडित मुलीची आई व मुंडे कुटुंबातील लोकांशी फोनवरून संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. घाबरु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारवर दबाव आणेल, असे आश्वासन त्यांनी दिले. राहुल गांधी यांनी संपदाच्या कुटुंबियांकडून व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून या प्रकरणाची संपूर्ण माहितीही घेतली.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर चुकीचे काम करण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात होता, त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. नाईक निंबाळकर यांच्या गुंडगिरीच्या अनेक घटना प्रकाशात आल्या आहेत. या घटनेतील कळस म्हणजे चौकशी करण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना जाहिर क्लिन चिट देऊन टाकली हे संताप आणणारे आहे. या प्रकरणाची चौकशी फलटण बाहेर करावी, उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी असून काँग्रेस पक्ष मात्र गप्प बसणार नसून डॉ. संपदा मुंडेला न्याय मिळवूण देण्यासाठी रस्त्यावर उतरेल. दिल्लीत कालच युवक काँग्रेसने आंदोलन केले आहे. महिला काँग्रेसही याप्रकरणी राज्यभर आंदोलन करेल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, या प्रकरणी महिला आयोगाची भूमिकाही संताप आणणारी असून पीडित कुटुंबाला भेटून त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी होती पण त्यांनी आधी पोलीसांची भेट घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. महिला आयोगाने महिलांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन काम करणे गरजेचे आहे पण त्यांनी तसे न करता पोलिसांची वकिली केली. डॉ. संपदा मुंडे ज्या समाजाची आहे त्या समाजातील एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही. बीड जिल्ह्यात मध्यंतरी काही घटना झाल्या त्यावेळी येथील सत्ताधारी पक्षाचे एक आमदार दररोज प्रसार माध्यमासमोर येऊन भूमिका मांडत होते, आज ते गप्प आहेत. पंकजा मुंडे गप्प आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा दबाव झुगारून बोलले पाहिजे. मुंबईतील एक सामाजिक कार्यकर्त्या अनेक विषयावर आक्रमक भूमिका घेत असतात त्यांनीही या विषयावर मौन बाळगलेले आहे. नारायण गड व भगवान गडाला आमचे साकडं आहे की त्यांनी या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी पुढे यावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटले आहे