
अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा तसेच या गुन्ह्यात मदत करणाऱया इतर दोघांना राहुरी पोलिसांनी गजाआड केले असून, आणखी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.
दि. 1 सप्टेंबर 2023 रोजी अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिल्यानंतर राहुरी पोलिसांनी परशुराम निकम (वय 21, रा. बारागाव नांदूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुह्याच्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी निकम यास काल (दि. 15) संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले. तर घटनेतील पीडित मुलीला तिच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यास मदत करणारा सीताराम बाळासाहेब गायकवाड (वय 32), आकाश सुनील पवार (वय 19, दोघेही बारागाव नांदूर, ता. राहुरी) या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर सदर गुह्यात साहाय्य करणाऱया आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे. मुख्य आरोपी निकम याच्यावर बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील करत आहे.
महिनाभरात सहा मुलींचा लागला शोध
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून महिनाभरात राहुरी तालुक्यातील पळवून नेलेल्या सहा अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेत मदत करणाऱयांच्या देखील मुसक्या आवळून गजाआड केले जात आहे.

























































