
महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगडमध्ये प्रस्तावित असलेला साडेतीन हजार कोटींचा बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्पही गुजरातमध्ये पळविण्यात आला. हा प्रकल्प देखील गुजरातमध्ये गेल्याने यामुळे निर्माण होणाऱ्या 80 हजार रोजगाराच्या संधीलाही महाराष्ट्रातील तरुण मुकले आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रातून रद्द का झाला असा प्रश्न शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. महाराष्ट्रासाठीच्या महत्त्वाच्या योजनेअंतर्गत बल्क ड्रग पार्क स्थापन न करण्यामागची कारणे काय आहेत ? असा प्रश्न राऊत यांनी संसदेत उपस्थित केला.
राऊत यांनी बल्क ड्रग पार्कबाबतचा प्रश्न विचारताना लोकसभेत म्हटले की, “या महत्त्वाच्या योजनेसाठी महाराष्ट्रानेही सहमती दर्शवली होती. महाराष्ट्रातील रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा देण्याचीही तयारी महाराष्ट्राने दर्शवली होती. संसदीय समितीमध्येही याबाबत चर्चा झाली होती ज्यात महाराष्ट्रातील रायगडमध्ये बल्क ड्रग पार्कची स्थापना होईल. मात्र अचानक माहिती मिळाली की महाराष्ट्रातील बल्क ड्रग पार्क रद्द करण्यात आला आहे. मला ही माहिती जाणून घ्यायची आहे की महाराष्ट्रासाठीच्या महत्त्वाच्या योजनेअंतर्गत बल्क ड्रग पार्क स्थापन न करण्यामागची कारणे काय आहेत ?”
देशातील औषधांच्या एकूण गरजेच्या 20 टक्के गरज ही महाराष्ट्रातून भागविली जाते. व्हॅक्सिनचे सर्वाधिक उत्पादक हे महाराष्ट्रा आहेत. जागतिक पातळीवर औषध उत्पादनांचे मानांकन असलेले प्लाण्ट हे महाराष्ट्रात आहेत. वितरण व्यवस्था आहे, शीतगृह आहेत, बंदरे आहेत, निर्यातीच्या सुविधांत निती आयोगाच्या क्रमवारीतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडूनही महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी सर्व अनुकूल असल्याचे सांगण्यात आले होते. हे सर्व असतानाही दिलेला बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प महाराष्ट्राकडून का हिरावून घेण्यात आला असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात आहे. या प्रश्नाला आजपर्यंत ईडी सरकारला समाधानकारक उत्तर देता आलेले नाहीये.
खासदार राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, बल्क ड्रग पार्क कुठे असावा याच्या निकषांची यादी तयार करण्यात आली होती. जिथे इको सिस्टीम असावी, जिथे योग्य व्यवस्था असेल. ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण व्हायला हव्यात अशी एक सूची तयार करण्यात आली होती आणि त्याचे मूल्यमापन करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती. मूल्यमापन झाल्यानंतर सचिवांच्या एका समितीने त्याचा आढावा घेऊन बल्क ड्रग पार्क कुठे तयार केला जावा याचे मेरीट तयार केले आणि त्याच्या आधारे हे पार्क देण्यात आले आहे. हा प्रकल्प उभा राहील तिथे क्लस्टर असणे, इंडस्ट्री (उद्योगक्षेत्र), जिथे कच्चा माल मिळणे, इकोसिस्टीम असणे या गरजेच्या बाबी असून त्या आधारे गुणांकन पद्धत तयार करण्यात आली होती. त्याआधारे बल्क ड्रग पार्क देण्यात आले आहे. प्रकल्पाबाबतचा निर्णय हा राजकीय नव्हता असेही मंडाविया यांनी उत्तरात सांगितले आहे.




























































