
कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्याचबरोबर आंतरजिल्हा बंदीही केली आहे. रायगड जिल्ह्यातील सीमा बंद केल्या आहेत. आज सकाळीपासून नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले असले तरी काही जण अनावश्यक बाहेर येणाऱ्या नागरिकांना पोलिसांचा प्रसाद खावा लागला असून जोर बैठकाही काढाव्या लागल्या. तर संचारबंदी लागू केली असून गर्दी करू नका असे आवाहन पोलिसामार्फत केले जात होते. तर शहरात येणारी वाहने पुन्हा पोलिसांनी माघारी फिरवली.
जिल्ह्यातील सीमा बंद केल्या असून संचारबंदी लागू केलेली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. उद्या 25 मार्च रोजी गुढीपाडवा सण साजरा होत असताना खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी गर्दी केलेली दिसत होती. तर किराणा मालाच्या दुकानात गर्दी पाहायला मिळत होती. मात्र अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर दुकाने बंद असल्याने गुडीपाडवा सणावर कोरोनाचा परिणाम दिसत आहे.
जिल्ह्यात संचारबंदी लागू असली तरी काही नागरिक अनावश्यक बाहेर पडत होते. या नागरिकांना पोलिसांकडून प्रसाद मिळाला असून अनेकांना उठा बश्या काढायला लावल्या. कोरोना विषाणू हा गर्दीमध्ये जास्त फैलावत असताना अजूनही नागरिक याबाबत जागृत होत नाहीत ही खरी शोकांतिका आहे.




























































