#Corona virus देशातील रेल्वे सेवा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या इतिहासात प्रथमच देशभरातील रेल्वे कोरोना व्हायरसमुळे थांबवण्यात येणार आहेत. प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, 31 मार्चपर्यंत कोणतीही प्रवासी रेल्वे धावणार नाही, असे केंद्र सरकारच्या वतीने आज जाहीर करण्यात आले. तसेच या काळात मुंबईतील लोकलसेवा देखील पूर्णपणे बंद राहणार आहे. दरम्यान या काळात मालगाड्या धावणार आहेत. कोरोना व्हायरसचे संक्रमण वेगाने होत असल्यामुळे देशाच्या 14 राज्यांतील 287 शहरे पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आली आहेत.

कोरोना व्हायरसचे संक्रमण प्रचंड वेगाने होत आहे. त्यात क्वारंटाईन केलेले नागरिक प्रवास करत असल्याचे आढळून आल्यामुळे आज देशभरातील रेल्वे थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यासंदर्भातील आदेश आज कॅबिनेट सचिवांनी जारी केले. बंदच्या काळात कोणतीही प्रवासी गाडी धावणार नाही, मात्र मालगाड्यांवर ही बंदी लागू असणार नाही, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मेट्रो, मोनो रेल्वेही बंद असणार आहेत. लोकल रेल्वेचा वापर केवळ अत्यावश्यक कर्मचाNयांना करता येणार आहे.

23 राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव
देशाच्या राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. यापैकी सर्वात जास्त उद्रेक महाराष्ट्रात झाला आहे. झारखंड, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम या राज्यांमध्ये कोरोनाने अद्याप प्रवेश केलेला नाही. मात्र उर्वरित सर्व राज्यांमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे.

राजधानी दिल्लीच्या सीमा सील
देशाची राजधानी दिल्लीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर दिल्लीच्या सातही जिल्ह्यांत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, विनाकारण घराबाहेर पडल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा केजरीवाल यांनी दिला आहे.