
देवेंद्र भगत । मुंबई
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ जणांचा बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून चर्चगेट ते विरारपर्यंतचे सर्व फ्लाय ओव्हर आणि फुटओव्हर ब्रिजची तपासणी करून सर्व ब्रिज ‘सुस्थिती’त असल्याचा अहवाल देण्यात आला. असे असताना आज अंधेरीचा गोखले पूल कोसळलाच कसा, असा सवाल करीत ‘रेल्वे’च्या स्ट्रक्चरल ऑडिटची पोलखोल महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.

अंधेरी पूल कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पश्चिम रेल्वे मार्गावर ८८ पादचारी पूल असून अन्यत्र २१ पूल आहेत. तर मध्य रेल्वेवर मुंबई विभागात १३४ पादचारी पूल आहेत. या पुलांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधीचा निधी रेल्वे प्रशासनाला दिला जातो. असे असताना पुलांची निगा का राखली जात नाही, असा सवाल यावेळी महाडेश्वर यांनी उपस्थित केला. संबंधित पुलाच्या देखभालीची सर्वस्वी जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त आनंद वाघ्राळकर, उपविभागप्रमुख सुभाष सावंत, शाखाप्रमुख संतोष कदम, नितीन डिचोलकर, नगरसेवक अभिजित सामंत आदी उपस्थित होते. दरम्यान, महापौर महाडेश्वर यांनी रुग्णालयात उपचार घेणार्या जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.
चार वर्षांत दिले १०३ कोटी २५ लाख
रेल्वे मार्गावरील फ्लाय ओव्हर ब्रिज आणि पादचारी पुलांची देखभाल पालिका करीत नाही. मात्र या कामासाठी पालिकेकडून रेल्वेला कोट्यवधीचा निधी दिला जातो. यामध्ये गेल्या चार वर्षांत पश्चिम रेल्वेला ११ कोटी २५ लाख तर मध्य रेल्वेला ९२ कोटी पालिकेने दिले असल्याची माहिती महापौर महाडेश्वर यांनी दिली.

अहवाल काय सांगतो…
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीत ‘चर्चगेट ते विरार’पर्यंतच्या मार्गावरील सर्व ब्रिज सुरक्षित (सेफ) असल्याची माहिती तपासणी अहवालावरून देण्यात आली होती. पश्चिम रेल्वेचे डिव्हिजनल इंजिनीयर आणि जनसंपर्क अधिकारी तुषार मिश्रा यांनी बोरिवली येथील शरद यादव यांना ही माहिती दिली होती. मात्र आजच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा दावा आणि तपासणी अहवालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




























































