खेडमध्ये पावसाची उसंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । खेड

गेले चार दिवस पावसाने सातत्य राखले असून आज दिवसभर आकाश काळ्या ढगांनी व्यापले होते मात्र पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते. तब्बल चार दिवस अहोरात्र कोसळत असलेल्या पावसाने थोडीशी उसंत घेतल्यामुळे आज शनिवार पासून बंद असलेल्या शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी थोड्या नाखुषीनेच हजेरी लावल्याचे दिसून आले. तालुक्यात गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने घरे-गोठयांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात आज सकाळी ७ च्या दरम्यान दरड कोसळल्यामुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. जगबुडीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने सकाळी ७ वाजता एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली तर तब्बल चार दिवसांनी खेड -दापोली मार्गावरील पुराचे पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे. नारंगी नदीच्या पुराचे पाणी शनिवार पासून सलग चार दिवस या मार्गावर असल्याने ही वाहतूक ठप्प झाली होती. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे बाजारपेठेत दूध, भाजी यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची आवक घटल्यामुळे काही प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे.

तालुक्यात पावसाचा जोर कायम असून अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील वाहतुक विस्कळीत होण्याचे प्रकार सुरु असून रस्त्यावर झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. कुरवल खेड येथे कालच्या पावसाने जिल्हा परिषद मालकीच्या विहिरीचे कठडे वाहून गेले आहेत. वावे तर्फे खेड गावठाण येथे एका घराची पडवी पावसाने कोसळली. कुरवल खेड येथे काल झालेल्या अतिवृष्टीने रस्त्यावर दरड कोसळली मात्र तहसीलदार शिवाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसिबी च्या साहयाने दरड बाजूला केली आहे. पन्हाळजे बलदेव वाडी येथे एका घरालगत जमीन खचण्याची घटना घडली आहे .कोतवली येथील हरिश्चंद्र बाबु कांदेकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. जगबुडी नदीच्या पुराचे पाणी रात्री अपरात्री बाजापेठेत येत असल्याने व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. रात्री उशिरा संततधार सुरू होणाऱ्या पावसाने व्यापाऱ्यांची चिंता वाढली असून दोन दिवसांपूर्वी शहरात असणाऱ्या पूर रेषेची पातळी पाण्याने ओलांडली होती. मुसळधार पावसाने रस्ते खचणे, डोंगराची माती रस्त्यावर येणे यासारखे प्रकार सुरू असून नारंगी व जगबुडी नदीकिनारी असलेली भातशेती पुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे कुजून जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.