पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण – राजापूरवर दहशतीचे सावट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येनंतर राजापूरसह रत्नागिरी जिह्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने सगळेच हबकले आहेत. कोकणातील स्थानिक भूमिपुत्र आणि पोलीसही माहिती द्यायला घाबरत आहेत. रिफायनरीचे समर्थन करण्यासाठी तसेच रिफायनरीविरोधात न बोलण्यासाठी स्थानिकांवर प्रचंड दबाव असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भूमाफिया पंढरीनाथ आंबेरकर याच्यापासून जीवाला धोका असल्याच्या तक्रारी काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

राजापूरात आधी नाणार आणि आता बारसू सोलगावमधील प्रस्तावित रिफायनरीच्या निमित्ताने गेल्या सहा वर्षांत आंबेरकर आणि त्याच्या गुंडांनी दहशत माजवली आहे. 12 सप्टेंबर 2022 रोजी राजापूर न्यायालयाच्या आवारात सामाजिक कार्यकर्ते आणि रिफायनरी विरोधी संघटनेचे पदाधिकारी नरेंद्र जोशी आणि दीपक जोशी तसेच इतर कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. आंबेरकर आणि त्याच्या गुंडांकडून तो करण्यात आला होता. त्याबाबत आंबेरकर याच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली होती. परंतु त्याची काहीच दखल पोलिसांनी घेतली नव्हती. त्यामुळे बळ आलेल्या आंबेरकर आणि त्याच्या गुंडांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच 13 सप्टेंबरला 2022 रोजी कार्यकर्ते आणि शेतकऩयांना ठार मारण्याच्या खुलेआम धमक्या दिल्या होत्या.

भूमिपुत्रांवर तडीपारीच्या कारवाया

आंबेरकर आणि त्याच्या गुंडांविरोधात कारवाई न करता पोलिसांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱया सामाजिक कार्यकर्ते सत्यजित चव्हाण, नितीन जठार, अमोल बोळे, नरेंद्र जोशी, सतीश बाणे, दीपक जोशी, नितीन जठार, अमोल बोळे, नरेंद्र जोशी, सतीश बाणे, दीपक जोशी यांच्यावर तडीपारीची कारवाई केली अशी माहिती हाती आली आहे.

पोलीस कॉल डिटेल्स तपासणार

पत्रकार वारिशे यांची हत्या पूर्वनियोजित होती असे चौकशीत समोर आल्यानंतर पोलिसांनी आता आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचे कॉल डिटेल्स मागवले आहेत. आंबेरकर वापरत असलेल्या मोबाईल सीमकार्ड पंपनीकडे ही माहिती मागवण्यात आली आहे. वारीशे यांना गाडीखाली चिरडण्यापूर्वी आणि घटनेनंतर आंबेरकरने कोणाकोणाला कॉल केले होते त्याची माहिती मिळाल्यास या प्रकरणामागचा मास्टर माईंड कोण आहे हे समोर येणार आहे. इतर लाचखोर पत्रकारांप्रमाणे वारिशे यांना पैसे देऊन शांत करण्यात अपयश आल्याने त्यांना कोदवली गावात गाठून तिथेच गाडीखाली चिरडायचे अशी योजना आंबेरकरने आधीच आखली होती असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आंबेरकर टोळीतील हेच ते गुंड

आंबेरकर आणि टोळीने बारसू व आसपासच्या परिसरात प्रचंड दहशत माजवली आहे. आंबेरकरसह अभिजित गुरव, संकेत खडपे, राजा काजवे, सुनील राणे, सौरव खडपे, राजाराम गुरव, गौरव परांजपे, पुरुषोत्तम खांबल, अशपाल हाजू, विनायक कदम, नंदू चव्हाण हे स्थानिक भूमीपुत्रांना धमकावून त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अनेक तक्रारी राजापूर पोलीस ठाण्यात नोंद आहेत.

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा भूमाफियांवर वरदहस्त?

रिफायनरीसाठी धमकावून तसेच आमिषे दाखवून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करणाऱया भूमाफियांना विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचा वरदहस्त असल्याचाही स्थानिकांचा आरोप आहे. त्यांच्या बळावरच आंबेरकर टोळीने राजापूरात दहशत माजवली असून त्यांच्यावर कारवाई करू नये म्हणून पोलिसांवरही सामंत बंधूंचा दबाव असतो असे ग्रामस्थ सांगतात.

हत्येचा तपास डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्याकडे

शशिकांत वारिशे हत्येचा तपास करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संजय राऊत शुक्रवारी रत्नागिरीत वारिशे कुटुंबीयांची भेट घेणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे 17 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी दौऱयावर जाणार आहेत. त्यांच्यासमवेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील. या दौऱयात संजय राऊत हे राजापुरात जाऊन वारिशे कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. वारिश यांच्या हत्येमागे षड्यंत्र असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असून उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जाबही विचारला आहे.