
राजस्थानने सलग दुसऱयांदा चेन्नईचा पराभव करीत अर्ध्या टप्प्यावर असलेल्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले. राजस्थानच्या 203 धावांचा पाठलाग करणारा चेन्नईचा संघ 170 धावाच करू शकला आणि राजस्थानने 32 धावांनी दणदणीत विजय नोंदविला.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि यशस्वी जैसवाल आणि जोस बटलरने 86 धावांची खणखणीत सलामी देत आपला निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. जैसवालने 43 चेंडूंत 77 धावा ठोकल्या. शेवटच्या तीन षटकांत ध्रुव जुरेल (34) आणि देवदत्त पडिक्कलने 49 धावा चोपल्यामुळे राजस्थानला 5 बाद 202 धावा करता आल्या. राजस्थानचे आव्हान चेन्नईला पेलवलेच नाही. ऋतुराज गायकवाडने 47 तर शिवम दुबेने 33 चेंडूंत 52 धावा ठोकल्या, पण तो संघाला विजयपथावर नेऊच शकला नाही. त्यातच अश्विन आणि अॅडम झम्पाने अचूक मारा करत चेन्नईला बांधून ठेवले.






















































