नाशिकमार्गे धावणाऱ्या राजधानी एक्प्रेसला हिरवा झेंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

देशातील पहिला रेल्वेमार्ग जेथे तयार झाला त्या मध्य रेल्वेच्या मार्गावरील पहिली राजधानी एक्स्प्रेस येत्या शनिवारपासून सुरू होत आहे. मुंबई शहरातून दिल्लीसाठी जाणाऱ्या या तिसऱ्या राजधानी एक्स्प्रेसला येत्या शनिवारी सीएसएमटी येथे होणाऱ्या सोहळ्यात रेल्वेमंत्री पीयूष गोयल हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यावेळी विविध उपनगरीय सेवांचे उद्घाटन होणार आहे.

मध्य रेल्वेची पहिली राजधानी एक्स्प्रेस आठवडयातून दोनदा सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) व्हाया नाशिक धावणार आहे. या मुंबईतून सुटणाऱ्या दोन राजधानी गाडया पश्चिम रेल्वेच्या मार्गाने गुजरात राज्यातून जातात. मध्य रेल्वेची ही नवीन राजधानी महाराष्ट्रातून कल्याण, नाशिक, जळगाव अशी जाणार आहे. ट्रेन क्र.22221 मुंबई हजरत निजामुद्दीन द्वि -साप्ताहिक गाडी आठवडयातून दोनदा बुधवारी आणि शनिवारी सीएसएमटीहून दुपारी 2.50 वाजता सुटून दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकात गुरुवारी आणि रविवारी सकाळी 10.20 वाजता पोहचणार आहे तर ट्रेन क्र.22222 परतीची गाडी 20 जानेवारीपासून हजरत निजामुद्दीन – मुंबई दिल्लीतून दर गुरुवार आणि रविवारी सायं.4.15 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सीएसएमटीला सकाळी 11.55वा. पोहचेल.

या गाडीचे बुकिंग 18 जानेवारीपासून सुरू होत असून कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भोपाळ, झाशी आणि आग्रा कॅण्टॉन्मेंट असे थांबे आहेत. या गाडीला एक फर्स्ट एसी, तीन एसी 2 टीयर, 8 एसी 3 टीयर आणि पॅण्ट्री कार अशी डब्यांची रचना आहे.

विविध सोयीसुविधांचे लोकार्पण
रोह्यापर्यंत ‘मेमू गाडी’च्या फेऱ्या पुणे-कर्जत -पुणे पॅसेंजर्स गाडी पनवेलपर्यंत चालवण्यासह मध्य आणि पश्चिम मार्गावरील अनेक सोयीसुविधांचे यावेळी सीएसएमटी येथे उद्घाटन होणार आहे.
मध्य रेल्वेच्या राजधानीचा प्रवास
सीएसएमटी दुपारी 2.50 (सुटणार)
कल्याण दुपारी 3.36 ते 3.38
नाशिक रोड सायंकाळी 5.56 ते 5.58
जळगाव जं. रात्री 8.17 ते 8.19
भोपाळ जं. रात्री 2.00ते 2.10
झाशी जं. पहाटे 5.26 ते 5.30
आगरा सकाळी 7.55ते 7.57
निजामुद्दीन सकाळी 10.20 (पोहोचणार)