
प्रसाद नायगांवकर । यवतमाळ
सातत्याने शेतकरी विरोधी धोरण राबवत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात यवतमाळ येथे माजी खासदार नाना पटोले आणि शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पंचनामा आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांपुढे बोलताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचा पंचनामा करत जोरदार हल्लाबोल केला. पिककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यावरून शेट्टी यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढले.
‘बँकेतील लोकं कर्ज देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करतात आणि त्यांना फक्त एक दिवसाची पोलीस कोठडी मिळते. मुख्यमंत्र्यांचे गृह मंत्रालय काय करत होते? मुख्यमंत्र्यांना याची लाज वाटायला पाहिजे’, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला. तसेच यवतमाळमध्ये फवारणीमुळे ३२ शेतकऱ्यांचा बळी गेला व हे प्रकरण दाबण्यासाठी कृषीमंत्र्यांना पैसे पोहचवले गेले, त्यामुळे कृषी मंत्री मालामाल झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पिककर्जावरून सुनावले
खरीपाची पेरणी सुरू झाली असून शेतकर्यांना पेरणीसाठी अजूनही पिककर्ज मिळालेले नाही. बँका शेतकर्यांना कर्ज देत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे बँका ऐकत नाही. शासन पैसे देणार की नाही, याची श्वाश्वती बँकांना नाही, त्यामुळे बँका पिककर्ज वाटपात आखडता हात घेत आहेत. शासनाच्या धोरणामुळेच शेतकर्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ शेतकर्यांवर आल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
कर्जमाफीचा लाभ नाही तर मनस्ताप
कर्जमाफी शेतकर्यांना लाभ देणारी नाही तर शेतकर्यांना मनस्ताप देणारी असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. कर्जमाफीला एक वर्ष पूर्ण झाले. या एका वर्षांत शेतकर्यांची कर्जमाफी झाली नाही. मुख्यमंत्री बँर्र्स समितीच्या बैठका घेत आहेत. कर्जवाटप करावे असे वारंवार सांगत आहे. मात्र, बँका मुख्यमंत्र्यांचे ऐकत नसल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. शासनाची यंत्रणा असताना ऑनलाईन प्रक्रियेसाठी ‘युनोवेब’या खासगी कंपनीला ७५० कोटीचा कंत्राट देण्यात आला. यामुळे मुख्यमंत्र्यांशी जवळीक ठेवणाऱ्यांना फायदा झाल्याचा आरोप त्यांनी केला. माहिती गोळा करण्यात ही यंत्रणा अपूरी पडत असल्याने त्यांचा फटका शेतकर्यांना बसल्याचा आरोपही त्यांनी केला.































































