राज्यसभेसाठी उद्या मतदान, महाविकास आघाडीचे पारडे जड; अपक्ष, छोटे पक्ष मविआसोबत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येतेय तसा महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱया अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या आमदारांची संख्या वाढत आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याने राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच पारडे अधिकच जड झाले आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱया सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीत शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण महाविकास आघाडीकडून चार तर भाजपकडून तीन उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार या निवडणुकीत भाजपचे दोन तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येईल. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत होणार आहे.

महाविकास आघाडीकडे असलेली अतिरिक्त मते व आघाडीला पाठिंबा देणारे छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने संजय पवार यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत असून मंगळवारी सायंकाळी ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या आघाडीच्या बैठकीला 12 हून अधिक अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या आमदारांनी उपस्थिती लावली. यामुळे महाकिकास आघाडीचं पारडं चांगलंच जड झालं आहे.

विधान परिषद उमेदवारीची नाराजी भोवणार

विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षाबाहेरून आलेले प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली. खोत, मेटे यांच्यासारख्या मित्र पक्षांनाही डावलण्यात आले. यावरून भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराजी वाढत दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आणि छोटय़ा पक्षांना भाजप नेत्यांनी कितीही गोंजारण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही. विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने पक्षांतर्गत नाराजी भाजपला अधिक भोवण्याची शक्यता आहे.

फोडाफोडीला प्रतिसाद नाही, अपक्षांची भाजपकडे पाठ

भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येईल एवढी मते नसतानाही अधिकचा एक उमेदवार उभा करत फोडाफोडीचे राजकारण भाजप राज्यात करू पाहत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्वतः अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या आमदारांना फोनवरून संपर्क साधून भाजपच्या महाडिक यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड आदी नेते पायाला भिंगरी लावून अपक्षांच्या पाठिंब्यासाठी दारोदार फिरत आहेत. पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याने निवडणुकीआधीच भाजपला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपने फक्त वापरून घेतले!

-भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतले, अशा तीव्र शब्दांत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आपली नाराजी उघड केली. विनायक मेटे 2014 पासून भाजपसोबत आहेत. भाजपच्या सत्तेच्या काळात त्यांना मंत्रीपदाची संधीही मिळाली नव्हती. इतर निवडणुकीतही काटा मिळाला नसल्याची त्यांची तक्रार आहे.

राज्यसभेबाबत इशारा

रात्री उशिरा मेटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि उमेदवारीबाबत फेरविचार करावा अन्यथा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबत निर्णय घेऊ. विधानसभेत आमचेही आमदार आहेत, असा इशाराच दिला.