
सामना ऑनलाईन । मुंबई
मुलीला पळवून नेण्यास मदत करण्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या रोषाचे धनी झालेले भाजपचे आमदार राम कदम पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचे अमेरिकेत निधन झाल्याचे राम कदमांनी जाहीर करून तिला ट्विटरवरून श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे.
राम कदम यांनी शुक्रवारी दुपारी 1.50 च्या सुमारास एक ट्वीट केलं. राम कदम यांनी आपल्या ट्वीटमध्ये, “हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमधली अभिनेत्री आणि एकेकाळी सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि आपल्या अभिनयाने सर्वांचे डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड… सोनाली यांचं अमेरिकेत निधन झालं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली…” असं लिहिलं.

आपल्याकडून चुकून ट्वीट झालंय हे लक्षात आल्यावर अर्ध्या तासानंतर त्यांनी ते ट्वीट डीलिट केलंय आणि “सोनाली बेंद्रे यांच्या निधनाबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो”, अशी सारवासारव करत नवीन ट्वीट केलं आहे.





























































