माँसाहेबांच्या आठवणींना उजाळा; ‘रमाधाम’ला मातृशक्ती, भक्तीचा संगम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांची 93 वी जयंती म्हणजेच ममता दिन आज ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रमाधाम वृद्धाश्रमातही माँसाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी मातृशक्ती आणि भक्तीचा अनोखा संगम सर्वांनाच अनुभवला. सुश्राव भजनात उपस्थितीत सारेच रंगून गेले.

खोपोली येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने व माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून भव्य वृद्धाश्रम उभारण्यात आला आहे. या वास्तूशी अनेकांचे भावनिक नाते जोडले गेले असून त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आज माँसाहेबांच्या जयंती दिनी सकाळपासूनच रमाधाममध्ये उत्साहाचे वातावरण होते. रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी मंत्री सुभाष देसाई, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी माँसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंदूमामा वैद्य यांनी माँसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, माँसाहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या रमाधाममुळे अनेक आजी-आजोबांना हक्काचा मायेचा निवारा मिळाला. रमाधामचे हे वैभव पाहण्यासाठी आज मीनाताई हव्या होत्या असेही म्हणाले. दरम्यान, माँसाहेबांना अभिवादन केल्यानंतर पहिल्या दिवंगत महिला आघाडी प्रमुख अॅड. सुधाताई चुरी यांना चंदुमामा वैद्य यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमासाठी युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, महिला आघाडी उपजिल्हा संघटक अनिता पाटील, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, शहरप्रमुख संतोष देशमुख, युवासेना शहर संघटक संकेत सोरटे, जी.एम. गावकर, माजी शहरप्रमुख दिलीप पुरी, बंटी नलावडे, विलासराजे चाळके, सुविधा विचारे, विश्वास चव्हाण, नितीन मोरे, वैजयंता गायकवाड, भारती लोते, सिद्धेश पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.