। चिरंजीव केले जनी दास दोन्ही।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्वाच्या उत्पत्तीबद्दल वेद सांगतात की परमात्म्याच्या इच्छेमुळे संपूर्ण सृष्टी घडली. सृष्टी निर्मितीचा शोध घेणे हे विज्ञान, अध्यात्म, तत्त्वज्ञ, संशोधकांचे काम आहे. आपण सामान्यांनी, ‘हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ असे म्हणून सृष्टीच्या विविध लीला, रंगतरंग, क्षणोक्षणी बदलते रुप पाहून आश्चर्यचकित व्हावे आणि आनंद घ्यावा एवढेच! ‘चिरंजीव केले जनी दास दोन्ही’ या ओळीत सप्तचिरंजीवांमधील हनुमान आणि बिभीषण या रामभक्तांचे स्मरण आहे. सप्तचिरंजीव म्हणजे अश्वत्थामा, बळीराजा, व्यास, हनुमान, बिभिषण, परशुराम आणि कृपाचार्य! हे सातही चिरंजीव म्हणजे सत् प्रवृत्ती, सद् विचार, सद् वर्तनाचे, अपार शक्ती, अतुलनीय भक्ती चे परिमाण आहेत. माणूस हा सर्व गुणदोषांनी युक्त असतो. पण तमोगुणामुळे गुण किंवा सद्प्रवृत्ती दडपल्या जातात आणि षड् रिपूंचा प्रभाव वाढत जातो. गुण, शक्ती, आचार, विचार, बुद्धी, कर्तृत्व या सर्वांचा विचार केला असता सप्तचिरंजीव आपल्यासाठी अनंत काळापर्यंत आदर्श आहेत. हनुमान हा भक्ती कशी करावी याचे मूर्तीमंत उदाहरण आहे तर बिभिषण अन्यायाचा विरोध करणारा, सत्याला न्याय देणारा आहे, म्हणून श्रीरामाचा भक्त आहे. अशा पुण्यात्म्यांचे स्मरण करणे, असे वर्तन असणे म्हणजे रामभक्ति करण्यासारखे आहे, नाही का? मग रामभक्तांची उपेक्षा कशी काय होईल?

– संध्या शहापुरे