देशभरात 15 वर्षांत बलात्काराच्या 4 लाख घटना; अद्याप एकालाही फाशी नाही

864
प्रातिनिधिक फोटो

तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील डॉ. प्रियंका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देश हादरून गेला आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, 15 वर्षांपूर्वी बलात्कार प्रकरणात देशात शेवटची फाशी देण्यात आली होती. त्यानंतर एकाही बलात्कार प्रकरणात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच या 15 वर्षांच्या काळात देशभरात बलात्काराच्या 4 लाखांपेक्षा जास्त घटना घडल्या आहेत.

अप्लवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी धनंजय चटर्जीला कोलकातातील अलीपूर तुरुंगात 14 ऑगस्ट 2004 मध्ये फाशी देण्यात आली होती. त्यानंतर देशभरात बलात्काराच्या 4 लाख घटना घडल्या आहेत. मात्र, कोणत्याही प्रकरणात बलात्काऱ्यांना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. धनंजय चटर्जीला फाशी देण्यात आली तेव्हा केंद्रात काँग्रेसप्रणीत युपीए आघाडीचे सरकार होते. मनमोहन सिंग तेव्हा पंतप्रधान होते आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती होते. धनंजय चटर्जीने केलेली दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली होती.

नवी दिल्लीत 2012 मध्ये झालेल्या निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात आले. न्यायालयाने 9 महिन्यात निकाल देत 13 सप्टेंबर 2013 मध्ये आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, आतापर्यंत या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. निर्भया प्रकरणानंतर कठुआ बलात्कार प्रकरण, मुंबईतील शक्तीमिलमधील बलात्कार यासह देशभरात 15 वर्षांत 4 लाख बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गेल्या 15 वर्षात कोणत्याही प्रकरणात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे बलात्कारांना तातडीने फाशीची शिक्षा देत त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे. इतर देशात अशा प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात येतात. आपल्या देशातही अशाच प्रकारची शिक्षेची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही होत आहे.

देशभरात दरवर्षी 40 हजार बलात्काराची प्रकरणे उघड होतात. दररोज 109 तर दर तासाला 5 मुलींबाबत अशा घटना घडतात. मात्र, समाजाच्या भीतीमुळे आणि मानहानीच्या दबावामुळे अनेक प्रकरणे उघड होत नाहीत. गेल्या 10 वर्षात 2.79 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 40 हजार प्रकरणांपैकी 10 हजार घटना अल्पवयीन मुलींसोबत घडल्या आहेत.तर सुमारे 2 हजार मुलींवर गँगरेप होतात. अशा अनेक प्रकरणात काही त्रुटींमुळे आणि पुराव्याअभावी फक्त 25 टक्के आरोपींनाच शिक्षा सुनावण्यात येते. तर सुमारे 71 टक्के प्रकरणांची नोंदच होत नाही. देशभरात सुमारे तीन कोटी प्रकरणे न्यायालयात आहेत. या आकडेवारीकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या