
देशभरात बलात्काराच्या घटनांत मोठी वाढ झाली असून, आरोपींना त्वरित शिक्षेची मागणी होत आहे. गुन्हा करूनही दोषींना मोकळीक मिळत असल्याने उत्तर प्रदेशातील बागपत सामूहिक बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. अज्ञात व्यक्तीने पीडितेच्या घरावर धमकीचे पोस्टर्स लावले आहेत. जर दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयात 13 तारखेला साक्ष दिली तर उन्नावपेक्षाही भयंकर घडेल, असे पोस्टर्समध्ये म्हटले आहे.
या प्रकरणामुळे पीडितेसह कुटुंबीयांत खळबळ उडाली असून, पोलिसांनी तत्काळ संरक्षण दिले आहे. पीडितेच्या आजोबांनी बडौत पोलीस ठाण्यात या प्रकाराची तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीच्या गुह्यांसह पोलिसांनी आरोपीविरोधात धमकीचा गुन्हा दाखल करत जामिनावर असलेल्या सोरणला ताब्यात घेतले आहे.
काय आहे नेमके प्रकरण…
दिल्ली येथे जानेवारी 2018 मध्ये पीडिता शिक्षणासाठी मुखर्जीनगरात राहत होती. त्यावेळी तिथे बागपत जिह्यातील बडौतचा रहिवासी सोरणने 8 मार्च रोजी मित्राच्या घरी पीडितेला नोटस् देण्यासाठी बोलवले. त्यानंतर कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार केला व त्याचे व्हिडीओ शूटिंग करून तिला ब्लॅकमेल करत असे. या प्रकाराला कंटाळून पीडितेने जुलै 2018 मध्ये मुखर्जीनगर पोलीस ठाण्यात सोरणविरोधात अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. त्या प्रकरणाची सुनावणी 13 डिसेंबर रोजी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयात होणार आहे.
























































