एकदिवसीय मालिकेतून ऑस्ट्रेलियाने माघार घेतल्याने राशीद खान संतापला, ऑस्ट्रेलियन बोर्डाला दिली धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्चमध्ये होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालिका या वर्षी ऑस्ट्रेलियात होणार होती, मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात असून महिलांवर अनेक निर्बंध लादल्याचे कारण देत ही मालिका न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाने ही मालिका खेळण्यास नकार दिला आहे. यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि कर्णधार राशिद खान यावर निराश झाला आहे. तसेच कर्णधार राशिद खाननेही बिग बॅश लीग म्हणजेच बीबीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, “मार्चमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेण्याच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड अत्यंत निराश आणि दुःखी आहे. या विषयावर आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला अधिकृतपणे पत्र लिहिणार आहोत. खेळामध्ये राजकारण आणण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न आहे. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय अयोग्य आणि अनपेक्षित आहे. अफगाणिस्तानमधील क्रिकेटच्या वाढीवर आणि विकासावर याचा नकारात्मक परिणाम होईल”.

यावर राशिद खानने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की, ”ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय अन्यायकारक आणि दुर्दैवी आहे. या मालिकेत मला माझ्या देशाच्या संघाचे नेतृत्व करण्यास आनंद वाटला असता. मात्र आता या निर्णयामुळे आम्ही मागे ढकलले जाणार आहोत. जर तुम्हाला आमच्या सोबत खेळणे योग्य वाटत नसेल तर मला देखील बिग बॅश लीग मध्ये खेळणे योग्य वाटत नाही. कृपया राजकारणाला खेळापासून दूर ठेवा”.