
रशियातील फिफा विश्वचषकाची रंगत शिगेला पोचली असताना चेन्नईचे नामवंत हृदयरोगतज्ज्ञ डॉ के आर बालकृष्णन यांनी हृदयाला भिडणारी माहिती फुटबॉलशौकिनांना दिली आहे. डॉ बालकृष्णन यांचा फिफा विश्वचषकाला जाण्याचा मुळीच प्लॅन नव्हता. पण त्यांच्या चिमुकल्या रशियन रुग्णाने त्यांना थेट रशियात वर्ल्डकपची तिकिटे ऑफर केली आणि डॉक्टरांना या निरागस बालकाचा आग्रह मोडता आला नाही. एका हिंदुस्थानी नागरिकाचे हृदय प्रत्यारोपित केलेल्या ७ वर्षीय रशियन मुलाचे नाव आहे रोमन.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात रोमन आणि डॉ बालकृष्णन यांची चेन्नईत पहिली भेट झाली. कार्डीओमायोपाथी या हृदय विकाराने आजारी रोमनला श्वास घेणेही कठीण झाले होते. डॉक्टरांनी त्याची तपासणी करीत त्याला नवे हृदय बसविणे हा एकाच उपाय असल्याचे रोमनची बेरोजगार आई एकातेरिना हिला सांगितले. सुदैवाने अनेक अडचणींवर मात करीत यंदा जानेवारीत एका ब्रेनडेड प्रौढ व्यक्तीचे हृदय डॉ बालकृष्णन यांनी रोमनच्या छातीत प्रत्यारोपित केले. एप्रिल २०१८ मध्ये रोमन रशियात परतला. खरे तर मोठ्या आकाराचे हृदय रोमनच्या शरीरात बसवले असल्याने त्याचे शरीर या हृदयाला स्वीकारते का? हा यक्षप्रश्न डॉक्टरांपुढे होता. पण सुदैवाने काही काळाने रोमन ठीक झाला आणि सामान्य मुलांसारखा वागू लागला. आता फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने रोमनला आपल्या जीवनदात्याचे आभार मानावेसे वाटले आणि त्याने डॉक्टर अंकल वर्ल्डकपची तिकिटे पाठवतो ,मॅचेस पाहायला रशियात या असे आमंत्रण दिले. आपल्या या निरागस रुग्णाचा आग्रह डॉ बालकृष्णन यांना मोडवला नाही. त्यांनी तत्काळ रोमनच्या आमंत्रणाचा स्वीकार करीत रशियाला प्रयाण केले.
शरीर रशियन ,हृदय हिंदुस्थानी
सात वर्षीय रोमनला यंदा जानेवारीत चेन्नईच्या फोर्टिस मलर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परदेशी रुग्ण असल्याने रोमनला प्राधान्याने दात्याकडून हृदय मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याला रुग्णालयात प्रतिक्षेवर ठेवण्यात आले होते. त्याच काळात ४ जानेवारीला रोमनला अटॅक आला. सिरीयस झालेल्या रोमनवर त्वरित शस्रक्रिया करीत डॉ बालकृष्णन यांनी त्याला हार्ट पम्पवर ठेवले. सुदैवाने दोन आठवड्यानीच तामिळनाडू राज्य परिवहन प्राधिकरणाकडून एका ब्रेनडेड प्रौढाची माहिती डॉक्टरांना मिळाली. आपले हृदय दान करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या या व्यक्तीलाही डॉक्टरांसमोरच पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याच्या हृदयाची कार्यक्षमता ३५ टक्क्यांवर आली होती. आता पुन्हा नवी समस्या आली. पण हे हृदय रोमनच्या शरीरात रोपण करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. डॉ बालकृष्णन यांनी मनाचा निर्धार करीत १० मिनिटांतच त्या प्रौढाचे हृदय रोमनच्या छातीत प्रत्यारोपित केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यशही आले. आता रोमन अगदी ठणठणीत असून सध्या फिफा विश्वचषकाचा आनंद स्टेडियममध्ये जाऊन घेत आहे.



























































