रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे विविध पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाकडून 2018 सालचे सहा पुरस्कार जाहीर करण्यात आले. संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये आणि कार्यवाह सौ. शिल्पा पळसुलेदेसाई यांनी यासंदर्भात माहिती दिली.

पत्रकार मकरंद गंगाधर पटवर्धन यांना दर्पण पुरस्कार, आदर्श पौरोहित्य पुरस्कार वेदमूर्ती रवींद्र पटवर्धन, आचार्य नारळकर पुरस्कार सौ. मुग्धा महेंद्र पाध्ये, आदर्श कीर्तनकार पुरस्कार हभप पुंडलिक विठ्ठल हळबे, धन्वंतरी पुरस्कार वैद्य सुविनय विनायक दामले आणि उद्योजक पुरस्कार योगेश माधव सरपोतदार यांना प्रदान केला जाणार आहे.

येत्या 16 डिसेंबरला दुपारी 3 वाजता कर्‍हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात पुरस्कार वितरण होईल. या वेळी प्रमुख पाहुण्या पद्मराजे गर्ल्स स्कूल अँड कॉलेजच्या निवृत्त प्राध्यापिका सौ. चित्रा कशाळकर उपस्थित राहणार आहेत. अर्ज न मागवता स्वतः माहिती मिळवून संघातर्फे पुरस्कार दिले जातात.

मकरंद पटवर्धन यांनी दै. सकाळमध्ये विद्यार्थी बातमीदार म्हणून 2000 पासून सुरवात केली. शहरातील शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व अन्य विविध क्षेत्रांमधील बातम्या, लेख, छायाचित्रण ते करत आहेत. 2003 ते 2005 या काळात त्यांनी तरुण भारतमध्येही वार्ताहर म्हणून नोकरी केली. वैद्य सुविनय दामले हे मठ, वेंगुर्ला येथील असून सावंतवाडी आयुर्वेद महाविद्यालयात त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. आर्थिक परिस्थितीमुळे शुल्क देणे जमणार नाही त्यांनी वस्तूरुपात जसे केरसुणी, गोवरी, नारळ, कोकम, काजूगर, तांदूळ आदी धान्य वस्तुशुल्करूपात जमा करावे असे वस्तूविनिमय सुरू केले. 2013 मध्ये लिम्का बुक रेकॉर्डमध्ये याची दखल घेतली गेली.

हभप पुंडलिक हळबे हे 40 वर्षांपासून कीर्तनसेवा करत आहेत. ऋग्वेद शाखेचे वेदाध्ययन त्यांनी केले आहे. ते मुळचे निवसर येथील असून अनेक वर्षे पुण्यात आहेत. सौ. मुग्धा पाध्ये या कला शिक्षिका आहेत. यापूर्वी त्यांना राजापूर तालुका शिक्षक परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. शालेय जीवनात त्यांनी काढलेले चित्र जे. जे. स्कूल आर्ट प्रदर्शनात झळकले आहे. जालगाव येथील रवींद्र पटवर्धन हे अनेक वर्षे पौरोहित्य करत असून पुण्यातील पटवर्धन पाठशाळेत याज्ञिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. नावाजलेल्या महालक्ष्मी फूड्सचे मालक योगेश सरपोतदार हे कोकणातील यशस्वी उद्योजक आहेत.अभयराज जोशी, सुधीर नवाथे, संजय नवाथे, अनिकेत हर्षे, मिलिंद आठल्ये, सुहास ठाकुरदेसाई, सिद्धी बोंद्रे, ओंकार पेंढारकर व आदित्य पंडीत यांचा संघातर्फे विशेष सत्कार होणार आहे. तसेच विवाहाला 50 वर्षे पूर्ण झालेल्या ज्ञातीतील काही जोडप्यांचा सत्कार होईल.