रत्नागिरी – पुरुष बचत गटाची कमाल, केळींच्या बागांतून केली लाखोंची कमाई

कोकणच्या लाल मातीत केवळ सुपारी , नारळ आणि भाताचेच उत्पादन घेतले जाते, हा समज चुकीचा असल्याचे सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रयोगातून समोर येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावच्या 21 पुरूषांनी एकत्र येत बचत गट स्थापन केला असून या बचत गटाने सहा एकर क्षेत्रात केळीची लागवड करत तब्बल 60 ते 65 टनाचे उत्पादन देखील घेतले आहे. शेतकऱ्यांनी केलेला एकत्रित शेतीचा हा प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय .

संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावच्या 21 पुरूषांनी एकत्र येत बचत गटाच्या माध्यमातून ही किमया साधलीय. जमिन आणि पैशाच्या समस्येवर चर्चा करत या शेतकऱ्यांनी तोडगा काढला आणि त्यातूनच सहा एकरावर जवळपास 5 प्रकारची पिकं घेत त्यातून आर्थिक उन्नतीचा मार्ग साधला. त्यामुळे सध्या लाखोंची कमाई आणि लाखोंची उलाढाल देखील शेतीतून करता येऊ शकते याचं उत्तम उदाहरण या शेतकऱ्यांनी सर्वांसमोर उभं केलंय.

सरकारी मदतीची कोणतीही अपेक्षा न ठेवता 2015 साली स्थापन झालेला हा पुरूषांचा बचत गट आता वर्षाला 60 ते 65 टन केळींचं उत्पादन घेतोय. महत्वाची बाब म्हणजे या केळ्यांना जिल्ह्यातील बाजारपेठेतच पाठवलं जातं. केवळ एका पिकावर अवलंबून न राहता या शेतकऱ्यांनी भात, कलिंगड, दूध आणि गांडुळ खत निर्मिती देखील केलीय. महत्त्वाची बाब म्हणजे वर्षाला जवळपास लाखभर रूपयांच्या भाताची विक्री हे शेतकरी करतात. गीर गायींपासून दूध, शेण आणि गोमुत्रापासून जीवांमृत आणि गांडुळ खताची निर्मीती केली जाते .सेंद्रीय पद्धतीनं केल्या जाणाऱ्या या शेतातील उत्पादनांना बाजारात मागणी देखील चांगली आहे.

हे सारे यशस्वी प्रयोग पाहिल्यानंतर आता अन्य भागातील शेतकरी देखील एकत्रित शेतीचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे कोकणच्या लाल मातीत देखील भात किंवा पारंपरिक पिकांशिवाय इतरही पिकं घेत त्यातून चांगलं अर्थाजन होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण या शेतकऱ्यांनी सर्वासमोर उभं केलंय. संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील पुरुष बचत गटाने सहा एकरातील ही केळीची बाग स्वच्छ ठेवण्यावर सर्वाधिक भर दिला आहे . सुकलेली पाने बाजूला करणे, केळीची सुकलेली रोपं काढून टाकणे याच बरोबर झाडांना सेंद्रीय खतांचीच मात्रा देणे यावर सर्वाधिक भर दिला आहे . केळीची ही स्वच्छ सुंदर आणि निटनेटकी लागवड पाहून कृषी अधिकाऱ्यांनी देखील धामणी पुरुष बचत गटाचे कौतूक केले आहे .

पुण्याच्या बन्सूरी फाऊंडेशन या संस्थेकडून त्यांच्या सी एआर फंडातून एक टक्का व्याजानं कर्ज घेतलं आणि ते शेतकऱ्यांनी अल्पावधीत फेडलं देखील . शेतकऱ्यांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी यामुळे हे शक्य झाले असल्याचे या शेतकऱ्यांचे मार्गदर्शक अमोल लोध यांनी स्पष्ट केलं . धामणी येथील पुरुष बचत गटाच्या केळी लागवडीचा हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी जिल्ह्यातील विविध बचत गट भेट देत असतात . त्यांना सर्वप्रकारची माहिती येथे दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

आपली प्रतिक्रिया द्या