हर्णे येथील जय भवानी प्रतिष्ठानची पर्यावरण पुरक रंगपंचमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हर्णे येथील जय भवानी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या पर्यावरण पुरक रंगपंचमीला सर्व स्तरातील लोकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने रंग पंचमीचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. रंगपंचमी खेळणाऱ्यांमध्ये यावेळी आनंद उत्साह आणि जल्लोश पाहायला मिळाला.

दापोली तालूक्यातील हर्णे हे मच्छिमारीसाठी रत्नागिरी जिल्हयातील सुप्रसिध्द बंदर आहे. या हर्णे गावात जय भवानी प्रतिष्ठान असून दिपक खेडेकर हे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. दिपक खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या 12 वर्षापासून जय भवानी प्रतिष्ठान हे सामाजिक, शैक्षणिक, सहकार, क्रीडा, कला, आरोग्य, सांस्कृतिक, कृषी, साहसी खेळ आदी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवित आले आहे. या प्रतिष्ठानची रंगपंचमी ही जिल्हयात प्रसिध्द आहे. गेल्या 12 वर्षापासून दरवर्षी जय भवानी प्रतिष्ठानतर्फे आयोजित केल्या जात असलेल्या रंगपंचमीला केवळ सुके रंग वापरले जातात. सुक्या रंगाच्या उधळणीत आणि ढोल ताशांच्या गजरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या या रंगपंचमीला केवळ हर्णे येथीलच नव्हे तर तालूक्यातीलही अबालवृध्द, बाल गोपाळ, स्त्री पुरूष तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर हे उपस्थित राहून या रंगपंचमीची रंगत अधिक वाढवून रंगपंचमीचा उत्साह व्दिगुणीत करतात.

अतिशय शिस्तबध्द पध्दतीने आणि अगदी रस्त्याने जाणा-या कोणाही पादचारी अथवा वाहन चालक यांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊनच जय भवानी प्रतिष्ठानतर्फे रंग पंचमी साजरी केली जाते. हर्णे पाजपंढरी येथील लोकसंख्या किमान 20 हजार असून रंगपंचमी साजरी करताना रंगपंचमीत सहभागी होणाऱ्या विविध स्तरातील लोकांकडून गेल्या 12 वर्षात जय भवानी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला एकदाही गालबोट लागलेले नाही. हे जय भवानी प्रतिष्ठानचे खरे यश आहे.

रविवारी दुपारी 1 वाजता हर्णे येथे जय भवानी प्रतिष्ठानच्या रंग पंचमीचा वाजत गाजत रंगाच्या उधळणीचा खेळ सुरू झाला. हर्णे येथील समुद्र किनारी सायंकाळी 6 वाजता मोठया उत्साहात रंगपंचमी समाप्त करण्यात आली.