Ratnagiri News – संगमेश्वर-देवरुख मार्गावर मोठी वाहतूककोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. त्यातच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेले सोनवी पुलाचे काम आता संगमेश्वर-देवरुख मार्गालाही अडथळा ठरत आहे. यामुळे चाकरमान्यांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. बुधवारी सकाळपासूनच संगमेश्वर ते नवनिर्माण महाविद्यालय दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

सोनवी पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असून, पर्यायी मार्गांच्या अपुऱ्या नियोजनामुळे आणि वाढलेल्या वाहतुकीमुळे संगमेश्वर-देवरुख मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाने तत्काळ उपाययोजना करून मार्ग मोकळा करण्याची मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

संगमेश्वर सोनवी चौक येथे संगमेश्वर पोलीस तसेच वाहतूक पोलीस तैनात होते. मात्र सोनवी पूल ते गणेश कृपा हार्डवेअरपर्यंत एकेरी मार्ग असल्यामुळे पोलिसांना देखील वाहतूक सुरळीत करताना मनस्ताप सहन करावा लागला. बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून संगमेश्वर देवरुख मार्गावर मुंबईकडे परतणारी अनेक वाहने आल्यामुळे संगमेश्वर सोनवी चौक येथील वाहतूककोंडीचा फटका या वाहनांना बसला आहे.