
अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या हेमंत पाटील याचा पोलिसांनी पाठलाग केला त्यावेळी तो विक्रीसाठी आणलेले अंमली पदार्थ टाकून पळाला. तो पोलिसांच्या हातून निसटला असला तरी पोलिसांनी 1 किलो 70 ग्रॅम अमली पदार्थ, एक पांढऱ्या रंगाची दुचाकी, 2 मोबाईल, 2 इलेक्ट्रोनिक वजन काटे, पॅकिंग करिता लागणारी पाकिटे जप्त केली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून काही इसम अंमली पदार्थाची खरेदी- विक्री करत असल्याबबत माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने रत्नागिरी शहरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशा जाधव, जिल्हा विशेष शाखा, पदभार रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या होत्या.
पोलीस निरीक्षक निशा जाधव, जिल्हा विशेष शाखा, पदभार रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांच्या गोपनीय माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले तसेच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक गठित करण्यात आले. या पथकामार्फत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे अभिलेखावरील असलेला, माहितगार गुन्हेगार हेमंत पाटील हा आपल्या दुचाकी क्रमांक एम. एच. 08 ए. ए 8919 घेऊन रत्नागिरी शहरातील शिवाजी हायस्कूल रोड व परिसरामध्ये अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय बातमी प्राप्त झाल्याने तेथे सापळा रचण्यात आला व अधिक शोध घेत असता, शिवाजी हायस्कूल ते परटवणे येथील खाडी भागाजवळ असलेल्या झाडी-झुडपा लगत एक पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा व तिच्याजवळ एक इसम उभा असलेला दिसून आला.
पोलीस आपल्या दिशेने येत असताना पाहून हेमंत पाटील याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलीसांनी त्याचा पाठलाग केला, परंतु हेमंत पाटील तिथून पळून जाण्यास यशस्वी झाला. परंतु पळताना त्याचे दोन्ही मोबाईल खिशातून खाली पडले तसेच त्याने आपली दुचाकी व विक्री करिता सोबत आणलेले अमली पदार्थ व साहित्य तेथेच टाकून पळाला. घटनास्थळी मिळून आलेला एकूण 1 किलो 70 ग्रॅम अमली पदार्थ, एक पांढऱ्या रंगाची दुचाकी, 2 मोबाईल, 2 इलेक्ट्रोनिक वजन काटे, पॅकिंग करिता लागणारे पाउच व साहित्य असे पंचांसमक्ष जप्त करून सराईत गुन्हेगार हेमंत पाटील विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. 136/2023 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 20 (ब) (ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सराईत गुन्हेगार हेमंत पाटील याचा अधिक शोध घेण्यात येत आहे, तसेच गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.





























































