रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर ‘जैसे थे’, सणासुदीच्या दिवसांत कर्जदारांना दिलासा नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवरात्र, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या काळात कर्जदारांना दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने रेपोरेट जैसे थे 6.5 टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला नाही.

रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक बुधवारपासून सुरू होती. बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली. रेपोदरात कोणताही बदल केला नाही. 6.5 टक्के जैसे थे ठेवला आहे. चलनवाढ आणि जागतिक आर्थिक घटकांमुळे हा दर स्थिर ठेवल्याचे सांगण्यात आले.

आधी सहा वेळा वाढवला, आता चार वेळा स्थिर

रिझर्व्ह बँकेकडून देशातील इतर बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते त्याला ‘रेपोदर’ म्हणतात. रेपोदर कमी केला तर बँकांकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनाही स्वस्त कर्ज मिळते. त्यामुळे रेपोदराचा थेट परिणाम गृहकर्ज, वाहनकर्ज, पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांवर होतो. सध्या सणासुदीच्या दिवसांत खरेदी वाढते. कर्जदारांची संख्याही वाढते. त्यामुळे रेपोदर जर कमी झाला असता तर कर्जदारांना फायदा झाला असता.

रिझर्व्ह बँकेने तब्बल सहा वेळा रेपोदर वाढविला. 22 एप्रिल 2022 ला रेपोदर अवघा 4 टक्के केला होता. 22 मे 2022 ते 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत रेपोदर 6.5 टक्के केला. त्यानंतर सलग चार वेळा रेपोदर जैसे थे 6.5 टक्के स्थिर ठेवला आहे.

2 हजारांच्या नोटा जमा करण्याची मुदत आज संपणार; पुढे काय?

रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेत जमा करण्याची मुदत होती. ही मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढविली. उद्या मुदत संपत आहे. आता पुढे काय याचे उत्तर गव्हर्नर दास यांनी दिले आहे. रिझर्व्ह बँकेच्या 19 कार्यालयांपैकी कुठेही लोक आपल्या 2 हजारांच्या नोटा जमा करू शकतात. टपाल खात्यामार्फतही रिझर्व्ह बँकेकडे नोटा पाठविण्यात येतील. आतापर्यंत 2 हजारांच्या नोटा 3.43 लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. आणखी 12 हजार कोटी रुपयांच्या नोटा बाजारात आहेत, त्याची प्रतीक्षा बँकांना आहे.