
राजेश देशमाने । बुलढाणा
गोवर रुबेला लस दिल्यामुळे गेल्या तीन दिवसात १७ शालेय मुलांना रिअॅक्शन आल्यानंतर आज चवथ्या दिवशी आणखी १२ मुलांची तब्येत अत्यवस्थ झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
गोवर रुबेला लसीकरणाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. त्यानंतर बुलढाणा अंचरवाडी, मातला, मढ येथील नऊ मुलांना रिअॅक्शन आली होती. त्यांना वेगवेगळ्या दवाखान्यात भरती करण्यात आले होते. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. गुरुवारी तिसर्या दिवशी ८ मुलांना रिअॅक्शन आली होती. अंगाला खाज येणे, उलटी होणे, यासारखे प्रकार झाल्यामुळे काळजीपोटी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रात्री त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आज चवथ्या दिवशी आणखी १२ मुलांना लसीमुळे रिअॅक्शन आली आहे. त्यामध्ये करवंड आश्रम शाळेतील ८ वी व ९ वीच्या मुलां-मुलींना रिअॅक्शन आली आहे. त्यामध्ये रेश्मा राजु राठोड, सोनाली उंबरकर, सोमनाथ भगवान गायकवाड, पवन विष्णू देशमुख, बुलढाणा येथील राजीव गांधी मिल्ट्री स्कूलचे शुभम मंडावार, चेतन गणेश तारु, जीवन राहुल वाकोडे, मयुर दादाराव उगले, ओम राजेंद्र सोनुने, सागर लक्ष्मण शिंदे, आदेश दत्ता तारु, अनिकेत ज्ञानेश्वर अंभोरे यांचा समावेश आहे. या मुलांना लस घेतल्यानंतर त्रास होत असल्यामुळे त्यांना तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दररोज कुठे ना कुठे गोवर रुबेला लसीकरणामुळे शालेय मुलांना रिअॅक्शन येत असल्यामुळे पालकामध्ये घबराटीचे वातावरण आहे. परंतु जिल्हा आरोग्य यंत्रणेने पालक व शिक्षकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी व रिअॅक्शन आल्यात तात्काळ दवाखान्यात भरती करावे, असे आवाहन केले आहे.


































































