बारशापासून नागबळीपर्यंत सबकुछ आता ईएमआयवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

केवळ पैशाअभावी कोणताही धार्मिक विधी वेळेवर करता येत नसलेल्या भाविकांसाठी देशात प्रथमच नाशिकरोड येथील महर्षी ज्योतिष कार्यालयाने सुलभ हप्त्यांची सुविधा आणली आहे. यासाठी बँक कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसात देशभरातील 1200 भाविकांनी विविध विधींसाठी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

आजकाल कर्जाच्या सुलभ हप्त्यांमुळे सामान्य नागरिकांना मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर आणि गाडी खरेदीचे स्वप्न पूर्ण करणे सहज शक्य होते. मात्र, वेळेवर पैसे उपलब्ध नसल्याने अनेकजण धार्मिक विधी करू शकत नाही. योग्य मुहूर्तावर संबंधित विधी करण्याची इच्छा अपूर्ण राहिली, ही खंत कायम मनात राहते. अशा भाविकांसाठी नाशिकरोड येथील महर्षी ज्योतिष कार्यालयाने दक्षिणा सुलभ हप्त्यात देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी दिली. याद्वारे देशातील कुठल्याही तिर्थक्षेत्री धार्मिक विधी करता येणार आहे. यासाठी श्यामराव विठ्ठल को-ऑप. बँकेकडून कर्ज दिले जात आहे. या सुविधेअंतर्गत बारसे, लग्न, अभिषेक, वास्तुशांती, सत्यनारायण, कालसर्प, नारायण नागबली, महामृत्युंजय अनुष्ठान असे सर्व विधी करण्यात येत आहेत. पूर्ण दक्षिणा किंवा त्यातील काही रक्कमेचे कर्ज घेऊन ती रक्कम 12 हप्त्यात देता येईल, त्यासाठी महर्षी ज्योतिष कार्यालय व बँकेचा प्रत्येकी एक अर्ज भरून द्यावा लागेल. यासाठी व्याज, प्रोसेसिंग फी, डाऊनपेमेंट भरावे लागणार नाही, तसेच कोणत्याही जाचक अटी नाहीत.