
श्रीरामपूर शहरातील कर्मवीर चौकातील एका मेडिकल कर्मचाऱ्याने रेमडेसिवीरचा औषधाचा पुरवठा केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दिनेश बनसोडे असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवर औषधाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे. यापूर्वी पोलिसांनी राहाता तालुक्यातील कोल्हार येथील शुभम श्रीराम जाधव, बार्शी तालुक्यातील भातंबरी येथील प्रविण प्रदीप खुने या दोघांना औषधाचा काळाबाजार करतांना पकडले आहे. रेमडेसिवीर औषधांची किंमत 4 हजार 800 रुपये असताना हे औषध 20 हजार रुपये किंमतीस विकत असताना पोलिसांनी शुभम जाधव, प्रविण प्रदीप खुने या दोघांना रंगेहाथ पकडले. दोघेही नरसिंग चे विद्यार्थी आहेत. कर्मवीर चौकात नव्याने सुरू झालेल्या एका कोविड सेंटर मध्ये ते काम करतात. ज्या दिवशी या कोवीड सेंटर चे उद्घाटन झाले त्या नंतर दुसऱ्या दिवशी रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार उघड झाला. या प्रकरणात काही डाॅक्टरांचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तीन ही आरोपी पोलिस कोठडीत आहे. तपासात महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक नाशिक येथे पाठविण्यात आले आहे.
































































